
अकोले तालुक्यातील सुगावा येथे धक्कादायक घटना घडलीय. प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात उलटली. यावेळी बोटीतील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अहमदनगर : अकोले तालुक्यातील सुगाव येथून धक्कादायक घटना समोर आलीय. प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटल्यानं या बोटीतील तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीय.
नेमकं काय घडलं? : सागर पोपट जेडगुले, (वय 25, रा.धुळवड, ता. सिन्नर ) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय 18) रा. पेमगिरी ता. संगमनेर) हे दोघं प्रवरा पात्रातील पाझर तलावाजवळ आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही बुडाले. त्यातील सागर जेडगुलेचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं. मात्र, यावेळी दुर्दैवानं एसडीआरएफची बोट पाण्यात उलटली. यात पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झालाय. प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा, अशी मृत जवानांची नावं आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी दिली घटनास्थळी भेट…
या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे.