१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य, फास्ट टॅग स्टिकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं घ्यायचं? वाचा…

Spread the love

राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग सक्तीचे केले आहे. यामुळे टोलनाक्यावरील गर्दी टाळता येणार आहे.

*मुंबई/ प्रतिनिधी –* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग (Fastag Sticker) सक्तीचे केले आहे. टोलनाका पार करण्यासाठी सर्व वाहनांवर फास्ट टॅग लावणे अनिवार्य झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील चारचाकी वाहनधारकांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे.

*फास्ट टॅग नसेल तर काय असेल दंड ?…*

टोल नाक्यांवर गाड्यांसाठी लागणारा वेळ आणि ट्रॅफिकची समस्या टाळण्यासाठी हा निर्णय सक्तीचा करण्यात आला आहे. नियमांनुसार, जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला टोल दराच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल.  सध्या काही जण फास्ट टॅग स्टीकर गाडीवर न लावता टोल नाका आल्यावर काचेवर धरायचे, मात्र तसे आता चालणार नाही. या नियमाचं आता १ एप्रिलपासून कठोरपणे पालन केलं जाणार आहे.

*काय आहे फास्ट टॅग –*

फास्ट टॅग प्रोग्राम रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन तंत्रज्ञानावर चालतो. फास्ट टॅग स्टीकर वाहनावर लावल्यानंतर वाहन धारकाला टोल नाक्यावर थांबून टोल न देता फास्ट टॅगचा कोड स्कॅन करून थेट अकाऊंट मधून पैसे देता येतात. यासाठी फास्ट टॅगसोबत बँक अकाऊंट लिंक केलेले असले पाहिजे. बँक वॉलेटमधून डिजिटली पैसे कापले जातात. फास्ट टॅगची वैधता ५ वर्षांची असते. बँक अकाऊंटमधून पैसे कापले जात असल्याने पैसे देण्यासाठी थांबावे लागत नाही, परिणामी टोल नाक्यांवर गर्दी कमी टाळता येते.

*फास्ट टॅग स्टिकर कुठून घ्यायचा, किंमत किती….*

फास्ट टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळतो. आरटीओ ऑफिस, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बँकांमध्ये फास्ट टॅग उपलब्ध करण्यात येतात. जर तुम्ही नवीन कार खरेदी केली असेल तर कारवर आधीच फास्टॅग इन्स्टॉल केलेले असते. त्याचा तुम्हाला रिचार्ज करावा लागतो. फास्टॅग खराब झाला तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI द्वारे स्थापन केलेल्या विक्री केंद्रांमधून फास्टॅग स्टिकर खरेदी करू शकता. त्याचबरोबर My Fastag ॲप डाउनलोड करुन फास्ट टॅग सक्रीय करू शकता. याशिवाय टोल प्लाझा येथील विक्री केंद्रातून बनवलेला फास्टॅगही तुम्ही घेऊ शकता.

बँकेतूनही फास्टॅग खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाऊन फास्टॅगची विनंती करावी लागेल, तुम्ही ते फक्त ऑनलाइन खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरही फास्टॅग खरेदी करू शकता. UPI ॲप्स वापरत असलात तेथूनही खरेदी करू शकता. फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुम्हाला 400 ते 500 रुपये खर्च करावे लागतील

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page