रत्नागिरी प्रांत कार्यालय आयोजित, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब सहकार्याने सायकल रॅली…

Spread the love

मी मतदान करणार, तुम्हीही करा, ते आपले कर्तव्य-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. 7 (जिमाका): रत्नागिरी उपविभागीय कार्यालय आयोजित आणि रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जनजागृती करणारी सायकल रॅली शहरातून आज काढण्यात आली. ‘मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा, तुमच्या शेजाऱ्यांनाही करायला प्रोत्साहित करा. ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे’, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.

येथील पोलीस मैदानात आज सकाळी रॅलीसाठी सायक्लिस्ट आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीला प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस दलाचा बँड तैनात होता. तो देशप्रेमावर आधारित गीताची धून वाजवित होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह रत्नागिरी सायक्लीस्ट क्लबचे डॉ. नितीन सनगर आणि सायक्लिस्ट आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, मी जेथे जातो, तेथे सर्वप्रथम माझे मतदानाचे ओळखपत्र करुन घेतो. येथेही ओळखपत्र घेतले आहे. यंदाच्या निवडणुकीत मी मतदान करणार आहे. तुम्हीही करा. त्याचबरोबर तुमच्या शेजाऱ्यांना आणि तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी सांगा.

उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी सर्वांचे स्वागत करुन, प्रास्ताविकेत मतदान जनजागृतीपर सायकल रॕलीचा उद्देश सांगितला. त्यानंतर त्यांनी मतदान करण्याबाबत उपस्थित सर्वांना शपथ दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी, कर्मचारी, सायक्लिस्ट यांनी येथील फलकावर मतदान जनजागृतीपर संदेश लिहून, स्वाक्षरी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला.

पोलीस मैदान ते शासकीय रुग्णालय ते तेली आळी- मांडवी बीच- टिळक आळी-गोखले नाका- मारुती मंदिर ते पोलीस कर्मचारी वसाहत अशा मार्गावरुन ही सायकल रॅली मतदान जनजागृती करत निघाली. पोलीस वसाहत या ठिकाणी आल्यानंतर या रॅलीची सांगता झाली. या ठिकाणी रॅलीत सहभागी झालेल्या सायक्लिस्ट श्रध्दा रहाटे, प्रतिकेश बेंद्रे, सांची कांबळे आणि अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे, उपमुख्य कार्यकारी श्री. देसाई यांना प्रातानिधिक स्वरुपात प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page