रत्नागिरीत शिक्षक संतोष गार्डी यांच्या संस्कारविश्व पुस्तकाचे प्रकाशन…

Spread the love

आबालवृध्दांनी आचरणात आणावेत असे नवे सुविचार – प्रज्ञा दळी

रत्नागिरी- अ. के. देसाई हायस्कूलचे शिक्षक संतोष गार्डी यांच्या संस्कारविश्व या सुविचारांच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन आज त्यांच्या मातोश्री सुनंदा गार्डी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठांनीही आचरणात आणावेत असे सुविचार संस्कारविश्व पुस्तकातून वाचकांसमोर आले आहेत. हे सुविचारच उद्याचे नागरीक घडवतील, असे उदगार अ.के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनी काढले.

शिक्षक संतोष गार्डी यांनी आजच्या काळात सुसंगत होतील असे सुमारे साडेतीनशेहून अधिक सुविचार लिहीले आहेत. या सुविचारांचा संग्रह त्यांनी तयार केला असून संस्कारविश्व या पुस्तकाचे प्रकाशन श्री साई क्रिएशन्सने केले. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी, माजी मुख्याध्यापक अशोक पाखरे, पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या प्राचार्या राजश्री देशपांडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, सुनंदा गार्डी, अनुराधा पाखरे, ज्योती गावंड, अनंत देवळेकर, पत्रकार दुर्गेश आखाडे, नरेश पांचाळ, विजय पाडावे, सचिन सावंत, सुशांत पवार, जीवन जाधव, अजय कांबळे, अतुल पाटील, संजय गार्डी, पंकज सुर्वे, सागर माईगडे, लेखक संतोष गार्डी, मिथीला गार्डी आणि मुग्धा गार्डी उपस्थित होत्या.

यावेळी प्राचार्या राधिका देशपांडे म्हणाल्या की, संस्कारविश्व या पुस्तकाची प्रस्तावना लिहीताना मला आनंद झाला. संतोष गार्डी हे माझे विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्याने गाठलेली उंची मान वर करून पाहताना खूप आनंद होतो. त्यांचे आज पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे. भविष्यात त्यांच्या पुस्तकांची एक साखळी व्हावी आणि ती वाचकांमध्ये लोकप्रिय व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक अशोक पाखरे यांनी संस्कारविश्व या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे विशेष कौतुक केले. मुखपृष्ठावरील पणतीप्रमाणेच पुस्तकातील सुविचार अंधःकार नष्ट करून प्रकाश टाकतील असे मत त्यांनी व्यक्त केले. लेखक संतोष गार्डी यांनी सुविचार लेखनाला सुरुवात ते संस्कारविश्व पुस्तकाची निर्मितीपर्यंतचा प्रवास मांडला. लहानपणापासून शाळेमध्ये आपण अनेक सुविचार शिकतो. नेहमी खरे बोलावे पासून सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असे सुविचार सतत आपल्या वाचनात येत असतात. त्याच्या पलिकडे जाऊन आजच्या काळाशी सुसंगत असे नव्या युगाचे नवे सुविचार संतोष गार्डी यांनी संस्कारविश्व या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page