देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.
*नवी दिल्ली :* पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech Red Fort) यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली अर्पण केली. हा देश त्यांचा ऋणी असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. महिला सक्षमीकरण, शेतकरी बळकटीकरण, तरुण, उद्योजक, भारतीय सेना, परराष्ट्र धोरण, कोरोना काळ, गुन्हेगारी आणि विकसित भारत यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी यांनी यावेळी भाष्य केलं.
*भारतीय सैन्याचं केलं कौतुक-*
“कोरोनाचा काळ विसरू शकत नाही. आपल्या देशानं कोट्यावधी लोकांना जगातील सर्वात जलदगतीनं लसीकरण केलं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कोरोनाकाळातील कामाची आठवण करुन दिली. “दहशतवादी येऊन आपल्या देशावर हल्ले करायचे. पण आपल्या सैन्यानं त्यांना सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. तेव्हा देशातील तरुणांची छाती अभिमानानं फुलली. त्यामुळं आज देशातील 140 कोटी नागरिकांना आपल्या सैन्याचा अभिमान आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं.
*देशवासियांकडून मागवल्या होत्या सूचना-*
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, “विकसित भारत 2047 साठी आम्ही देशवासियांकडून सूचना मागवल्या होत्या. आम्हाला मिळालेल्या सूचना आमच्या नागरिकांची स्वप्नं आणि आकांक्षा दर्शवतात. काहींनी भारताला कौशल्याचे भांडवल बनवण्याचा सल्ला दिला. तर काहींनी भारताला उत्पादनाचे केंद्र बनवून देश स्वावलंबी झाला पाहिजे,” असं सांगितलं. ” शासन आणि न्याय व्यवस्थेतील सुधारणा, ग्रीनफिल्ड शहरांची निर्मिती, क्षमता निर्माण, भारताचे स्वतःचे अंतराळ स्टेशन या नागरिकांच्या आकांक्षा आहेत. जेव्हा देशातील लोकांची मोठी स्वप्ने असतात, तेव्हा ते आपला आत्मविश्वास नव्या उंचीवर घेऊन जातात. आपण अधिक दृढनिश्चयी बनतो,” असे पंतप्रधान मोदींनी मत व्यक्त केलं.
*‘व्होकल फॉर लोकल’चा फायदा-*
“आम्ही ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र दिला. आज मला आनंद होत आहे, व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे. प्रत्येक जिल्ह्याला आपल्या उत्पादनाचा अभिमान वाटू लागला आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ असे वातावरण तयार केले जात आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
*2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनू-*
“ज्यांनी भारतातून वसाहतवादी राजवट उखडून टाकली, त्या ४० कोटी लोकांचे रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाहीत. आज आपण 140 कोटी लोक आहोत. जर आपण संकल्प केला आणि एका दिशेनं वाटचाल केली तर आपण सर्व अडथळे दूर करू शकतो. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनू शकतो,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विकसित भारतचा नारा दिला.
*संकटाच्या काळात देश सोबत-*
” या वर्षी आणि गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि संपत्ती गमावली आहे. देशाचेही नुकसान झालं. आज मी त्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करतो. या संकटाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी उभा आहे,” अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.