*कानपूर-* बांग्लादेशविरुद्ध कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहयला मिळाला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी टीम इंडियाने कसोटी टी-20 क्रिकेटसारखा खेळ करत सामना आपल्या नावे केला आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 35 षटके झाली होती. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे सामना होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती होती. तिसऱ्या दिवशी पाऊस नव्हता, पण आऊटफील्ड खराब असल्याने सामना होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत कानपूरचे नाव बदनाम झाले, पण चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जे घडले ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. दिवसाच्या सुरुवातीला सामन्याचा निकाल बरोबरीत येईल असे वाटत होते. पण आता पाचव्या दिवशी टीम इंडियाने सामना जिंकून बांग्लादेशला क्लीन स्वीप केला आहे.
कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ ड्रेसिंग रूममध्ये बसून सामना सुरू होण्याची वाट पाहत होते. तिसऱ्या दिवशीही संघ हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत. पण चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने तीन विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या सत्रात बांग्लादेशला 233 धावांत गुंडाळले. यानंतर रोहित आणि कंपनीने वादळ आणले. भारताने 34.4 षटकात 285 धावा केल्या आणि 9 गडी बाद झाल्यानंतर डाव घोषित केला. प्रत्येक फलंदाज स्फोटक शैलीतच खेळला. संघाचा रन रेटही 8.25 च्या आसपास होता.
आशाप्रकारे भारताला 52 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघ केवळ 146 धावा करु शकला. परिणामी टीम इंडियाला 95 धावांचे लक्ष्य मिळाले. गोलंदाजीत जडेजा अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत बांग्लादेशला हलक्यात गुंडाळले. 95 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून पुन्हा स्फोटक शैली पाहायला मिळाली. संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी ताबडतोड 58 धावांची भागीदारी केली. दोघांच्या भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुककर झाला. ज्यामध्ये यशस्वीने 51 धावा केल्या. तर कोहली 29 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मालिका विजय मिळवला आहे.