‘फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली…’, वंचित बहुजन आघाडीचा दावा..

Spread the love

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच राजकारणात खळबळ उडवणारी माहिती हाती आली आहे. राज्यातील भाजपा आणि शिवसेना (UBT) नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मातोश्री (Matoshree) येथे उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तसंच उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केल्यानं राजकीय खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ मोकळे यांनी केलेला हा दावा किती खरा किंवा खोटा यापेक्षा यापूर्वीची राजकीय समीकरणे पाहता राजकारणात काहीही अशक्य नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडे विश्वासार्ह बातमी?

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपाने २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडली आणि त्यानंतर राज्यात नवीन समीकरणं उदयास आली. आता पाच वर्षांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी खळबळजनक दावा केलाय. मोकळे यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपामधील राजकीय घटनाक्रमाबद्दल त्यांच्याकडं एक विश्वासार्ह बातमी आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास दिल्लीत, ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं…

एकीकडं दिल्लीमध्ये ही भेट झाली असताना दुसरीकडं ५ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे ही भेट घेण्यासाठी फडणवीस स्वतः एकटे गाडी चालवत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते आणि ही बैठक जवळपास दोन तास चालली होती. तसंच या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी ६ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. आता दिल्ली दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण होतं आणि त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटीगाठी घेतल्या? हे आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः जनतेला सांगावं, असंही सिद्धार्थ मोकळे यांनी आवाहन केलं.

मागील पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी-…

सिद्धार्थ मोकळे पुढे म्हणाले, “आम्हाला जी माहिती मिळाली ती आम्ही जनतेपुढे ठेवली आहे. कारण महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांना भाजपा तसंच त्यांचे मित्र पक्ष हे आरक्षण विरोधी असल्याचं पक्कं माहीत आहे. याच आरक्षणवादी मतदारांनी मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून दिलं आहे. याकरता महाराष्ट्रातील मागील ५ वर्षातील झालेल्या राजकीय घडामोडी पाहता यासंबंधी काही उलट सुलट राजकीय घडामोडी येत्या काही दिवसात घडल्या तर, महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होता कामा नये”. यासाठी आम्ही ही माहिती सार्वजनिक पटलावर ठेवत असल्याचंही वंचित बहुजन आघाडीनं स्पष्ट केलय.

पुरावे सादर करावेत-

या विषयावर बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या दाव्यात काही तथ्य आहे, असं काही वाटत नाही. जर का तसं काही असेल तर त्यांनी या संबंधित पुरावे द्यावेत कारण ही गोष्ट साधी नाही. फक्त आपल्या पक्षाकडं इतरांचं लक्ष वेधण्यासाठी हवेत बोलू नये. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यांची स्वतःची मतं त्यांच्याकडं न राहता ती काँग्रेसकडं वर्ग झालीत. अशा परिस्थितीमध्ये वंचितनं भाजपाला मदत होईल अशा पद्धतीचं काम केलय. म्हणून अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी मोठा भूकंप होईल अशी राजकीय घडामोड झाल्याचा खोटा खळबळजनक दावा करण्याचा हा प्रयत्न आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page