पाटणा पायरेट्सचा पुणेरी पलटणवर विजय; चढाईतील वर्चस्व राखत ३७-३२ असा विजय…

Spread the love

पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्सच्या रोमांचक सामन्यात पाटणाने अफलातून डिफेन्स आणि एकत्रित टीम वर्कच्या जोरावर पुण्याला मात दिली.

प्रो कबड्डी स्पर्धेत पाटणा पायरेट्सचा पुणेरी पलटणवर विजय; चढाईतील वर्चस्व राखत ३७-३२ असा विजय
प्रो कबड्डी स्पर्धेत पाटणा पायरेट्सचा पुणेरी पलटणवर विजय; चढाईतील वर्चस्व राखत ३७-३२ असा विजय


पुणे : देवांक दलालच्या आणखी एका वर्चस्वपूर्ण चढाईच्या खेळावर प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा पायरेट्स संघाने सोमवारी पुणेरी पलटण संघावर ३७-३२ असा सफाईदार विजय मिळविला. पाटणा पायरेट्स या विजयाने तिसऱ्या गुणावर आले. पुणेरी पलटणचा बाद फेरी गाठण्याचा मार्ग मात्र पुन्हा कठिण झाला.

पुणेरी पलटण उत्तरार्धात फ्लॉप…

पूर्वार्धात देवांकची कोंडी करण्याचे नियोजन पुणेरी पलटणला उत्तरार्धात राबवता आले नाही. उत्तरार्धातील सुरुवातीच्या सत्रातील प्रत्येक चढाईवर सरासरी दोन गुण घेत देवांकने पलटणला दडपणाखाली आणले आणि यातून पलटणचे खेळाडू बाहेरच पडू शकले नाहीत. पाटणाकडून देवांकने ११ गुणांची कमाई करताना आपले वैयक्तिक वर्चस्व कायम राखले. त्याला अयानने ९ गुणांची कमाई करत सुरेख साथ दिली.

शुभम शिंदेचा बचाव


चिपूळणच्या दसपटीत तयार झालेल्या शुभम शिंदेचे बचावातील ५ गुण आणि कर्णधार अंकितचे बचावातील ४ गुण पाटणाची ताक वाढवणारे ठरले. पलटण संघाकडून आकाश शिंदे आणि पंकज मोहिते या चढाईपटूंना आपला लौकिक राखता आला नाही. डावा कोपरारक्षक अमनने मात्र सहा गुणांची कमाई करुन आपली छाप पाडली.

अयानच्या चौफेर चढाया…

पूर्वार्धाच्या लढतीत पुणेरी पलटण संघाने देवांक दलालची कोंडी करत चांगली सुरुवात केली होती. पंकज मोहिते देखिल आपली जबाबदारी चोख बजावत होता. मात्र, त्यानंतरही सामना कमालीचा संथ सुरु होता. दोन्ही संघतील खेळाडू धोका पत्करण्यास तयार नव्हते. देवांकची सुरुवात अपयशी झाल्यावर अयानने जबाबदारी सांभाळत पाटणाची बाजू लावून धरली होती. शुभम शिंदे आणि अंकित यांनी बचावात अयानला चांगली साथ दिली. पाटणा संघाने आघाडी मिळवली होती. पलटण संघ लोणच्या उंबरठ्यावर होता. मात्र, एरवी बचावात पुढे असलेल्या अबिनेश नंदराजनने दोन वेळा लोणच्या नामुष्कीपासून वाचवले. पंकजने अबिनेशच्या साथीत देवांकची अव्वल पकड केली. पण, याचा फार काही फायदा झाला नाही. मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा पलटण १६-१३ असे जरुर आघाडीवर होते. पण, त्यांच्या मैदानात केवळ एकच खेळाडू शिल्लक होता.

उत्तरार्धात डाव फसला…

उत्तरर्धात सुरुवातीच्याच मिनिटाला पाटणा संघाने पलटणवर लोण देण्याची औपचारिकता पार पाडली. त्यानंतर प्रत्येक चढाईत गुणांची कमाई करताना देवांकने पलटणला पुन्हा एकदा लोणच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, या वेळी पुन्हा एकदा देवांकची अव्वल पकड करुन लोण वाचवला. पाठोपाठ पलटणने आणखी एक अव्वल पकड करताना अयानची कोंडी केली. सामना २३-२३ असा बरोबरीत आणला. पण, पाटणाच्या बचावफळीने चोख भूमिका बजावत पलटणवर दडपण आणले. देवांकने एकाच चढाईत आणखी दोन गुण कमावत उत्तरार्धातील पहिले सत्र पूर्ण व्हायच्या आत पलटणवर दुसरा लोण दिला. त्यानंतर पलटणच्या खेळाडूंना सामन्यात लय गवसलीच नाही. देवांक आणि अयानच्या चढायांना शुभम शिंदेच्या बचावाची सुरेख साथ मिळाली. या त्रिकूटाच्या जोरावर पाटणाने आणखी एका सफाईदार विजयाची नोंद केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page