
रत्नागिरी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा घेतो आणि मराठा म्हणून समाजात अभिमानाने वावरतो. पण आज या देशामध्ये, राज्यामध्ये मराठा समाज कोणकोणत्या क्षेत्रात आघाडीवर आहे याचा आपण अभ्यास कधी करणार असा सवाल रत्नगिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी उपस्थित मराठा समाजाला केला. आज यावर संशोधन होऊन भविष्यातील आपली दिशा ठरवणे आवश्यक आहे. मराठ्यांना अशक्य काहीच नाही मात्र निर्धाराने आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवली पाहिजे असेही ते म्हणाले.
रत्नागिरीमध्ये आज अखिल मराठा फेडरेशनतर्फे तिसरे अखिल मराठा महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अखिल मराठा फेडरेशनतर्फे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा “दि ग्रेट मराठा” पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाला खा. राणे यांनी मार्गदर्शन केले. खा. राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्थापन केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहिले. महाराजांनी आपल्याला जगण्याची प्रेरणा दिली. आपल्याला आपले हक्काचे राज्य दिले कारण त्यांच्यात स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा, उर्मी जिद्द होती. निर्धार होता. शेकडो वर्षानंतरही आपण महाराजांचा जयजयकार करतो पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण नेमकं आपल्या जीवनात काय करतो हे विचार करण्याची गरज आहे. आज महाराष्ट्रात आपला समाज कुठे आहे याची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण लढलो त्या मुंबईचा देशाच्या उत्पन्नात ३४ टक्के हिस्सा आहे; मात्र त्या मुंबईच्या उत्पन्नात मराठी माणसाचा हिस्सा फक्त १ टक्का आहे हे चित्र चांगल नाही.
आज मुंबईमध्ये मराठी माणूस नावापुरता राहिला आहे, असे सांगतानाच खासदार राणे पुढे म्हणाले की, आज बाहेरच्या लोकांनी येऊन या राज्यामध्ये उद्योगधंदे वाढवले, पैसे कमावले. त्यांना शक्य झालं मग आपल्याला शक्य का होत नाही. मराठी माणूस मुंबई बाहेर जातोय पण याचं कुणाला काही का वाटत नाही. महाराज हे आपले दैवत आहेत मात्र त्यांच्या स्वभावातील एक तरी गुण आपण घेतला पाहिजे. मराठा समाजातील लोकांनी व्यवसाय करावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मराठी मुले आयएस आयपीएस झाली पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्याला यशाचे, प्रगतीचे अट्रॅक्शन वाटलं पाहिजे. त्यासठी जिद्द धरली पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्यात गुणात्मक बदल करा. फक्त मराठी आहोत अभिमान बाळगू नका. नुसते मानाने नको तर आपल्या अस्तित्वाने कर्तुत्वाने आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याची हीच वेळ आहे.
माजी पालकमंत्री रवींद्र माने, माजी आमदार बाळ माने, निवृत्त इनकमटॅक्स अधिकारी अरुण पवार, भाजप जिलाध्यक्ष राजेश सावंत, माजी जिल्हा परिषद उपाअध्यक्ष उदय बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडीक, प्रायोजक उमेश भुबळराव, बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी, सुरेश कदम, प्रताप सावंत देसाई, संतोष तावडे यांचा सन्मान करण्यात आला.
या महासंमेलनाच्या निमित्ताने अखिल मराठा फेडरेशनच्या व सहआयोजक क्षत्रिय मराठा मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन तसेच स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी ‘इतिहासाच्या कोंदणातून वेध मराठ्यांच्या भविष्याचा’ या विषयावर तर दुसरे चर्चासत्र हे संध्याकाळी मराठा समाजाला उद्योगव्यवसायाकडे वळविण्यासाठी याविषयावर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मराठयांच्या इतिहासाचे परदेशी साधने नव्याने अभ्यासून ज्यानी संशोधन केले त्या डॉ. श्री जयसिंगराव पवार याना ‘अखिल मराठा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘अखिल मराठा समाज भूषण’ हा पुरस्कार इतिहासकार डॉ. इंद्रजीत सावंत, अणुशास्त्रज्ञ व गरिबासाठी नॅनो हाऊसिंगवर संशोधन करणारे डॉ. सुरेश हावरे याना देण्यात आला. तसेच ‘सारथी’ चे अध्यक्ष अजितराव निंबाळकर तसेच कर्नाटक राज्याचे चिफ सेक्रेटरी पद भूषविलेले अविनाश जाधव यांनाही ‘अखिल मराठा समाज भूषण’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता. अॅडव्हान्स सिव्हिल इंजिनिअरींगमध्ये प्राविण्य मिळविलेले असून जे पीटी स्लॅब मधील एक्स्पर्ट उमेश भुजबळराव यांना ‘अखिल मराठा समाज गौरव’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अखिल मराठा फेडरेशन व मराठा बीझनेसमेन फोरमचे संस्थापक अध्यक्ष व ज्यानी आपले उभे आयुष्य मराठा समाजाच्या विकासासाठी वाहिलेले होते त्या कै. शशिकांतजी उर्फ आप्पासाहेव पवार याना आणि कट्टर मराठा नेते दिवंगत केशवराव भोसले या महासंमेलनात मराठा समाजातर्फे मरणोत्तर ‘जीवन गौरव पुरस्कार’ घोषित करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबियांनी हा सन्मान स्वीकारला.