भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा लॉसने डायमंड लीगमध्ये 90 मीटरचा गुण कमी फरकानं चुकला. यात चोप्रानं हंगामातील सर्वोत्तम 89.49 मीटर थ्रो केला आणि दुसरं स्थान मिळवून डायमंड लीग फायनलचं तिकीट मिळवलं.
लॉसने (स्वित्झर्लंड) : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि पॅरिस ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा शुक्रवारी लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये सहभागी झाला. कंबरेच्या दुखापतीनं त्रस्त असतानाही भारताच्या गोल्डन बॉयनं स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. चोप्रानं हंगामातील सर्वोत्तम 89.49 मीटर फेक केला आणि डायमंड लीग मीटिंग सिरीजमध्ये दुसरं स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
नीरजची खराब सुरुवात –
नीरजनं 82.10 मीटरचा पहिला थ्रो केला, जो त्याचा सर्वोत्तम श्रो झाला नाही. पहिल्या थ्रोनंतर नीरज चौथ्या स्थानावर राहिला. यानंतर त्यानं 83.21 मीटरची दुसरा थ्रो केला आणि तिसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं 83.13 मीटर थ्रो फेकला आणि चौथ्या स्थानासह तो टॉप-3 मध्ये राहण्यापासून वंचित राहिला. यानंतर चौथ्या फेरीतही या स्टार खेळाडूनं निराशा केली आणि 82.34 मीटरचा थ्रो केला. चोप्रा पूर्णपणे लयीत दिसला नाही.
पाचव्या फेरीत 85.58 मीटर फेकला थ्रो-
नीरज चोप्रानं पाचव्या फेरीत 85.58 मीटर थ्रो कैला आणि तो पुन्हा पहिल्या 3 मध्ये आला. त्यानं या स्पर्धेत आपला सर्वोत्तम थ्रो नोंदवला आणि युक्रेनच्या फेल्फनरला मागे सोडलं, ज्याचा सर्वोत्तम थ्रो 83.38 मीटर होता.
सहाव्या फेरीत हंगामातील सर्वोत्तम थ्रो-
त्यानंतर सहाव्या फेरीत नीरज चोप्रानं आश्चर्यकारक कामगिरी केली आणि या मोसमातील सर्वोत्तम थ्रो त्यानं केला. तो फक्त 90 मीटरच्या गुणापेक्षा कमी पडला. 89.49 मीटरच्या मोसमातील सर्वोत्तम थ्रोसह, तो डायमंड लीग मीटिंग मालिका क्रमवारीत दुसरा आला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
अंतिम स्थिती :-
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – 90.61 मी..
नीरज चोप्रा (भारत) – 89.49 मीटर…
ज्युलियन वेबर (जर्मनी) – 87.08 मी…
अँडरसन पीटर्सनं मीटचा विक्रम
मोडला : ग्रेनेडाचा स्टार ॲथलीट अँडरसन पीटर्सनं शेवटच्या प्रयत्नात 90.61 मीटर फेक केला. या शानदार थ्रोसह, त्यानं 2015 मध्ये केशॉर्न वॉलकॉटनं सेट केलेला 90.16 मीटरचा मागील विक्रम मोडला.
फायनल 14 सप्टेंबरला-
नीरज 2022 मध्ये डायमंड लीग चॅम्पियन होता तर गतवर्षी तो दुसऱया स्थानावर होता, चालू हंगामातील डायमंड लीग फायनल 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणार आहे. डायमंड लीग मीटिंग सीरीज टेबलमध्ये टॉप-6 मध्ये असलेले खेळाडू अंतिम फेरीत सहभागी होतील, नीरजनं फायनलचं तिकीट पक्कं केलं आहे.
अर्शद नदीम सहभागी नाही :
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विक्रमी 92.97 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. त्याच्या व्यतिरिक्त, पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक अंतिम फेरीत अव्वल सहामध्ये स्थान मिळविलेल्या सर्व 5 खेळाडूंचा लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये समावेश करण्यात आला होता.