गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार सुरेश धस सतत नवनवे आरोप करून धनंजय मुंडे यांची अडचण वाढवत आहेत…
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. तर भाजपचे आमदार सुरेश धस हे रोज या प्रकरणात नवनवे आरोप करीत असल्यामुळे धनंजय मुंडे यांची चांगलीच गोची झाली आहे. दरम्यानच अजित पवार यांनीमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केलीय.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार सुरेश धस सतत नवनवे आरोप करून धनंजय मुंडे यांची अडचण वाढवत आहेत. मंत्री धनंजय मुंडे हे धस यांच्या टार्गेटवर असल्याचं आता लपून राहिलं नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धस यांनी आरोपांची राळ उडवली आहे.
धस यांचा आक्रमक पवित्रा, राष्ट्रवादीची बदनामी, अजितदादांना झळ सोसावी लागतेय…
पण धस यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे धनंजय मुंडेंसोबतचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्याची झळ सोसावी लागत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची रोज होत असलेली बदनामी आता अजित पवारांना काही सहन होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेचं अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धस यांची तक्रार केल्याचं बोललं जातंय. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती.
महायुतीतील मित्र पक्षांच्या आमदारांनी विनाकारण आरोप करु नये, दादा आक्रमक…
त्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि अभिमन्यू पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. पुरवे नसतानाही धस यांच्याकडून केले जात असलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीतील मित्र पक्षांच्या आमदारांनी विनाकारण आरोप करु नये अशी भूमिका अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांनी भेटून मांडल्याचे सांगितले जाते. तर आपल्या पक्षाच्या आमदारांना योग्य सूचना देणार असल्याचे फडणवीसांनी अजित पवारांना सांगितले.
सुरेश धस यांचा सूर नरमणार?…
खरं तर सुरेश धस यांच्या टीकेमागचं कारण म्हणजे पवनचक्की खंडणी प्रकरणात ज्या वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केलीय तो कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. आणि त्यामुळेच विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. पण या प्रकरणात सत्ताधारी आमदार धस यांनी उडी घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता अजित पवार-फडणवीसांच्या भेटीनंतर धस यांचा सूर नरमणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.