गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वात जास्त उमेदवार उत्तर. मुंबईत!…पालघर मध्ये सर्वात कमी!..’मुंबई वोट्स’या संस्थेच्या अहवालातून समोर….

Spread the love

मुंबई – विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वात कमी उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघात असल्याचे ‘मुंबई वोट्स’च्या विश्लेषणातून उघड झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुंबई वोट्स’ या संस्थेने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघ, ठाणे, पालघर आणि कल्याण अशा एकूण ९ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांचे राजकीय पक्ष, जाहीरनामे, उमेदवारांच्या संपत्तीमधील वाढ, गुन्हेगारी पार्श्वभूमी आदी विविध गोष्टींचे पाच वर्षांच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक निरीक्षण केले आहे. या संस्थेच्या अहवालानुसार विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार हे उत्तर मध्य मुंबई आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वात कमी उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघात आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर पालघर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

दरम्यान, आंदोलनासारख्या किरकोळ स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांच्या यादीत शिवसेना ठाकरे गट प्रथम, वंचित बहुजन आघाडी द्वितीय आणि शिवसेना शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खून, खंडणी, धमकाविणे आदी गंभीर स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांच्या यादीत वंचित बहुजन आघाडी प्रथम, समता पक्ष द्वितीय आणि रिपब्लिकन बहुजन सेना हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘मुंबई वोट्स’ या संस्थेने १८५ उमेदवार व त्यांचे शपथपत्र, जवळपास २० राजकीय पक्ष आणि ७ निवडणूक जाहीरनाम्यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून विविध निष्कर्ष निघाले, त्याबाबत ‘मुंबई वोट्स’ या संस्थेचे संस्थापक विवेक गिलानी यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत विस्तृतपणे विश्लेषण केले.

‘मुंबई वोट्स’ या संस्थेने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), राष्ट्रवादी शरद पवार गट आणि तृणमूल काँग्रेस या सात राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्याचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार भाजपच्या २०२४ च्या जाहीरनाम्याची २०१९ शी तुलना केल्यावर भाजपने २०१९ साली जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचे समोर आले आहे. तसेच कृषी, आरोग्य, कामगार व रोजगार, कायदा क्षेत्रासंबंधित मुद्द्यांना जाहीरनाम्यात विशेष महत्व देण्यात तृणमूल काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे. तर महिला विकासाच्या मुद्द्याला विशेष महत्व देण्यात काँग्रेस प्रथम क्रमांकावर व कायद्याच्या मुद्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आरोग्य आणि कामगार व रोजगार या मुद्द्यांना भाजपनेही विशेष महत्व दिले आहे.

पीयूष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार, तर श्रीकांत शिंदेंच्या संपत्ती वाढीचा दर सर्वाधिक

‘मुंबई वोट्स’ या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांच्याकडे ५४.२१ कोटी आणि भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांच्याकडे ४०.४७ कोटी इतकी संपत्ती आहे. तसेच गेल्या पाच वर्षांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या संपत्ती वाढीचा दर हा सर्वाधिक ६६९ टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांच्या संपत्ती वाढीचा दर ६१९ टक्के आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील हे ४८३ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर हा अवघा ३.५ टक्के इतका राहिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page