ठाणे : निलेश घाग आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी सुरु केली आहे. येत्या १५ दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण-डोंबिवली दौरा होणार असून यावेळी मेळावा सुद्धा घेतला जाईल. कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांवर आपली पकड घट्ट करण्यासाठी मनसेने हालचाली सुरु केल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहर अध्यक्षाची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर यानंतर उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या नव-नियुक्त्या करण्यात येणार आहेत, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
१५ दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण – डोंबिवलीत दौरा असून डोंबिवलीनंतर उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात येणार आहेत. आ. राजू पाटील
आगामी कल्याण डोंबिवली लोकसभा निवडणूक असो, विधानसभा असो किंवा येणाऱ्या महापालिका निवडणूक असोत, त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणी करुन जास्तीत जास्त घवघवीत यश मिळवण्याचा प्रयत्न असेल. आमचे विद्यमान आमदार राजू पाटील यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. खरंच जर निवडणूक लढवायची झाली आणि त्यांच्या नावावर राज ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं. तर खासदार निवडून आणण्याची संपूर्ण तयारी व्हावी. त्यादृष्टीने आज संपूर्ण डोंबिवली शहराची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. त्याच्यानंतर डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभा आहे आणि ज्या काही १२२ किंवा पॅनल नुसार १३३ जागा महापालिकेतील असतील. त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून कल्याण डोंबिवली महापालिकेवर मनसेचा महापौर बसवणं हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नवनियुक्त डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिली.