संंगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल मंगळवारी दुपारी ३.१५ वा. रंगला. ढोल- ताशांचा गजर आणि ग्रामदेवतेच्या नावाच्या जयजयकाराने हा पालखी भेट सोहळा रंगला.
हा अनोखा सोहळा व भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी मोठी यात्रा भरली होती.
तालुक्यातील करंबेळे-शिवने येथील सीमेवर देवरुख -संगमेश्वर मार्गावर दोन बहिणीच्या पालख्यांची आगळीवेगळी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते. ही पालख्यांची भेट म्हणजे केवळ दोन गावातीलच नव्हे तर तालुक्यातील भक्तगणांसाठी एक मोठा सोहळाच असतो. आजूबाजूच्या गावातील शिमगोत्सव संपन्न झालेले असल्याने करंबेळे व शिवने गावच्या सीमेवर होणारी दोन बहिणींच्या पालकीची भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. शिवने गावच्या पालखीतील ग्रामदेवता रवळनाथ, नवलाई, व पावणाई असून करंबेळे गावच्या पालखीत ग्रामदैवत गांगोबा, देवी निनावी व वाघजाई अशी ग्रामदैवत असतात. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गावातील पालखी वाजत गाजत जल्लोषात सीमेवर आणण्यात आल्या. दोन्ही पालख्यांची भेट घडवून आणताना भक्तगण आपल्या खांद्यावर भक्तांना उभे करून त्यांच्या खांद्यावर दोन्ही पालख्या देतात व ही अनोखी भेट घडवून आणली जाते.
यावर्षी ही भेट दुपारी ३.१५ वाजता घडली. या भेटीमध्ये दोन्ही पालख्यांमधील ओटींची अदलाबदल होते ही या पालखी भेटीचे वैशिष्ट्य आहे. भेटी दरम्यान पालखी जड येतात असे सांगितले जाते. भेटीनंतर शिवने गावच्या हद्दीत दोन्ही पालख्या नाचविल्या जातात. यावेळी शिवने येथे गाऱ्हाणी, नवस बोलले जातात, बोललेले नवस फेडले जातात. त्यानंतर करंबेळे गावची देवी आपल्या शिवने गावच्या बहिणीला म्हणजेच ग्रामदेवतेच्या पालखीला पाच पावले पुढे जाऊन निरोप देते.पूर्वीच्या काळी हे दोन गाव एकच होते. त्यानंतर गाव वेगवेगळे झाल्या नंतर या दोन पालख्यांची म्हणजेच बहिणींनीची भेट प्रतिवर्षी घडविली जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते. उत्सवादरम्यान मार्गाच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. या ठिकाणी मोठी यात्रा भरली होती. आबालवृद्धांनी या पालखी भेट सोहळाचा आनंद लुटला. दरम्यान सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावर वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी देवरुखचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक श्रीमती सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा पालखी भेट सोहळा अत्यंत शांतपणे मोठ्या उत्साहात पार पडला.