आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिल्लीसह इतर राज्यातील जागावाटपावरही तोडगा काढला आहे.
नवी दिल्ली- भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीअंतर्गत काँग्रेसची पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांत वेगवेगळ्या पक्षांशी जागावाटपावर चर्चा चालू आहे. दिल्लीमध्येही काही दिवसांपासून आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. दरम्यान, आता या दोन्ही पक्षात जागावाटपावर अंतिम तोडगा निघाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आप चार तर काँग्रेस तीन जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.
शुक्रवारी युतीची घोषणा?..
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार आप आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर एकमत झाले आहे. दिल्लीमध्ये आप एकूण चार तर काँग्रेस एकूण तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये काँग्रेसला पसंतीची एक तर आप पक्षाने दिलेल्या दोन अशा एकूण तीन जागा मिळणार आहेत. या युतीची अधिकृत घोषणा येत्या शुक्रवारी केली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस कोणकोणत्या जागांसाठी असणार प्रयत्नशील?
काँग्रेसच्या सूत्रांनुसार पूर्व आणि वायव्य दिल्ली मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जाणार आहे. तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसकडून चांदनी चौक, नवी दिल्ली किंवा पश्चिम दिल्ली या मतदारसंघासाठी प्रयत्न केले जातील.
दिल्लीतील तोडग्यामुळे इंडिया आघाडीला बळ…
दरम्यान, आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिल्लीसह इतर राज्यातील जागावाटपावरही तोडगा काढला आहे. यामध्ये गुजरात राज्याचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहेत. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेस आणि समावादी पार्टी यांच्यात तोडगा निघालेला नाही. असे असताना दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात यशस्वी जागावाटप झाल्यामुळे इंडिया आघाडीला बळ मिळाले आहे.