
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सेवा व्हेंटिलेटरवर !
दीपक भोसले / संगमेश्वर- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि संगमेश्वर तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्या बाजूला ट्रामा केअर सेंटर आहे. ट्रामा केअर सेंटर मुळे अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांना तात्काळ सुविधा मिळण्यास हातभार लागतो तसेच बाजूला असलेल्या ग्रामीण इमारतीमध्ये उपचारासाठी सुविधा असल्याने रुग्णांना सुविधा मिळत आहे.
▪️संगमेश्वर तालुक्यातील खाडी भागातील तसेच नायरी खोऱ्यातील रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा मिळण्यास हातभार लागतो. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदांपैकी एकच वैद्यकीय अधिकारी पद भरले गेले असून सर्व भार हा ट्रामा केअर सेंटर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणि ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचार करता मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी हा एकच असल्याने संपूर्ण भार एकाच वैद्यकीय अधिकारावर पडत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्स-रे मशीन सुसज्ज असून त्यासाठी एक ऑपरेटर ही आहे मात्र सोनोग्राफी मशीन नसल्याने गरोदर महिलांसाठी बाहेर जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन होती मात्र सोनोग्राफी मशीन ऑपरेट करण्यासाठी डॉक्टर नसल्याने त्या मशीनला इतर ठिकाणी हलवण्यात आलेली आहे. गेले अनेक वर्ष संगमेश्वर वासीयांना आरोग्याची सुविधा पुरवणारे ग्रामीण रुग्णालयाची इमारत दुरावस्थेत आहे. तीन वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी झाली असली तरी पावसाळ्यामध्ये इमारतीला गळती लागते तसेच इमारतीमधील खोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंश विंचुदंश किंवा इतर तात्कालीन औषध पुरवठा साठा चांगल्या प्रकारे आहे मात्र दररोजसाठी लागणाऱ्या औषधांचा अनेक वेळा साठा कमी पडतो शस्त्रक्रिया विभागाचे सुविधा चांगल्या प्रकारे आहे मात्र स्त्री रोग तज्ञ नसल्याने अनेक वेळा गैरसोय होते. ट्रामा केअर सेंटर मध्ये लॅब तंत्रज्ञ नसल्याने ब्लड बँक मधील टेक्निशियनला अतिरिक्त काम करावे लागत आहे. शव विच्छेदन केंद्र चांगल्या प्रकारे बांधण्यात आलेले आहे मात्र अनेक वेळा जवळच्या आरोग्य केंद्रातील तसेच तालुक्यातील अनेक मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्याचा भार संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडत आहे.
▪️संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरसाठी साठी एकच रुग्णवाहिका आहे त्यामुळे तत्काळ सुविधा देण्यासाठी चा भार 108 रुग्णवाहिकेवर पडत आहे.
▪️संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता पाहण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असल्याने इमारत तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जात आहे.
🔹️पुरेसा कर्मचारी वर्ग दिल्यास अजूनही चांगली सुविधा देऊ:- वैद्यकीय अधिकारी अभिजीत मोरे
▪️संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात दररोज येणाऱ्या रुग्णांवर चांगले उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. एकाच वेद्यकीय अधिकाऱ्यांवर भार पडत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो.
▪️अत्याधुनिक सुविधांप्रमाणे येथे पुरेसा कर्मचारी वर्ग दिल्यास रुग्णांना अजूनही चांगली सेवा देणे शक्य होईल असे वैद्यकीय अधिकारी अभिजीत मोरे यांनी “संगमेश्वर न्युज” शी बोलताना सांगितले.
▪️अपघातामध्ये किंवा इतर ठिकाणी गंभीर जखमी झालेल्या पाच टक्के रुग्णांना इतरत्र हलवावे लागत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.