
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्यांतील 88 जागांवर आज मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यात महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे खासदार शशी थरुर, काँग्रेसचे खासादर हेमा मालिनी, भूपेश बघेल, अभिनेता अरुण गोविल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील पाच जागांसाठी मतदान होणार आहे. तर केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3, मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी एक जागेवर आज मतदान होणार आहे. या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यातील 88 जागांसाठी एकूण 1202 उमेदवार रिंगणात आहेत.
🔹️दिग्गजांचं भवितव्य पणाला :
▪️वायनाड – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरुन डाव्यांनी ॲनी राजा यांना तर भाजपानं राहुल यांच्या विरोधात के सुरेंद्रन यांना उमेदवारी दिलीय.
▪️कोटा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भाजपाच्या तिकीटावर राजस्थानातील कोटा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ओम बिर्ला यांच्यासमोर भाजपा सोडून पक्षात दाखल झालेल्या प्रल्हाद गुंजाळ यांना काँग्रेसनं तिकीट दिलंय.
▪️मेरठ – अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवार असल्यानं चर्चेत आहेत. भाजपानं टीव्हीचे राम अरुण गोविल यांना मेरठमधून उमेदवारी दिलीय.
▪️पूर्णिया – पप्पू यादव बिहारच्या पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पप्पू काँग्रेसकडून तिकीटासाठी उमेदवार होते. पण या जागेवरुन आरजेडीनं आपला उमेदवार उभा केलाय.
खजुराहो – मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व्हीडी शर्मा खजुराहो मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळल्यामुळं ही जागा चांगलीच चर्चेत राहिली.
▪️बंगळुरु ग्रामीण – कर्नाटकातील बंगळुरु ग्रामीण मतदारसंघातून माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे जावई सीएन मंजुनाथ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश यांच्या विरोधात भाजपानं सीएन मंजुनाथ यांना तिकीट दिलं आहे.
▪️अमरावती – महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून हनुमान चालिसामुळं चर्चेत आलेल्या नवनीत राणांना भाजपानं उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारच्या उमेदवाराचं आव्हान आहे.
🔹️4 जूनला लागेल निकाल :
यंदा लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 102 जागांवर मतदान झालं होतं. तर सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी मतमोजणीनंतर समोर येतील.