अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज.
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथील एका बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगार चोरी प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या शिवसेना ठाकरे गटातील पुढाऱ्यांवर आता अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती पुढे आली आहे. ठाकरे गटाचे खेड तालुकाप्रमुख व लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, माजी पंचायत समिती सभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे व अंकुश काते या चौघा संशयितांनी भंगार चोरी प्रकरणात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
परंतु न्यायालयाने हा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्याने या चारही पुढाऱ्यांना पोलिसांकडून आता अटक केली जाण्याची शक्यता आहे. सध्या खेड पोलीस या चारही संशयित आरोपी असलेल्या पुढाऱ्यांचा कसून शोध घेत आहेत. लोटे एमआयडीसी येथील बंद पडलेल्या मिसाळ कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगाराची चोरी झाल्याचा प्रकार साधारण दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत उघडकीस आणला होता. या प्रकरणात एका स्थानिक युवक वैभव आंब्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या तपासात ठाकरे गटातील चार पुढाऱ्यांना या प्रकरणात संशयित आरोपी करण्यात आले आहे.