
पनवेल- नवीमुंबईत एका परप्रांतीय महिलेनं मराठी कुटुंबावर दादागिरी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पनवेलच्या भोकरपाडातील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. यावेळी परप्रांतीय महिलेनं घर सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मराठी कुटुंबानं केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनसेने या महिलेला जाब विचारला आहे. तसेच या सोसायटीच्या चेअरमन असलेल्या या परप्रांतीय महिलेला त्या मराठी कुटुंबाची माफीही मागायला लावली आहे.
पनवेलमधील भोकरपाडा भागातील एका सोसायटीत भाडोत्री कुंटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप गायकवाड या मराठी कुटुंबाने केला आहे. इथे हे कुटुंब भाड्याने राहत होतं. त्यांचं अँग्रीमेंट संपल्यावर ते दुसऱ्या रुमची शोधाशोध करत असल्याने त्यांनी त्या संदर्भात घर मालकाला कळवलं होतं. त्यांचं मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना रहाण्याची पवरानगी दिली होती. तरीही या सोसायटीच्या महिला चेअरमनकडून रुम सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप या मराठी कुटुंबाने केला आहे.
शिवाय भांडण करुन मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही असं म्हणत शिविगाळ केली गेल्याचं गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे, या वादात गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्यांने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या मराठी कुटुंबाने याबाबत मनसेकडे दाद मागितली. यानंतर मनसेच्या येथील महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार आणि मनसे कार्यकर्त्यांनी या सोसायटीजवळ जाऊन संबंधित परप्रांतीय महिलेला यासंदर्भात जाब विचारला. यावेळी आक्रमक झालेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिला चेअरमनचा माज मोडत मराठी कुटुंबाची माफी मागायला लावली. सोबतच या परप्रांतीय महिला चेअरमनला पुन्हा अशा प्रकारची तक्रार आल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याची तंबीदेखील मनसेच्यावतीने देण्यात आली आहे.