
अनेक ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार झालेल्या वानखेडे स्टेडियमची निर्मिती एका मराठी माणसाच्या अपमानातून झाली आहे. ती कशी झाली, जाणून घ्या रंजक गोष्ट.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई अन् या मुंबईतील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम म्हणजे चर्चगेटचं वानखेडे स्टेडियम. 1975 पासून उभं असलेलं हे स्टेडियम अनेक ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार झालेलं आहे. यात रवी शास्त्रींचे सहा चेंडूत सहा षटकार, 2011 चा भारताचा विश्वविजय, सचिन तेंडुलकरचा अखेरचा कसोटी सामना आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भावुक करणारी निवृत्ती, मुंबईकर मात्र न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एजाज पटेलच्या कसोटीच्या एका डावात 10 विकेट, असे एक ना अनेक क्षण वानखेडे स्टेडिमयनं अनुभवले आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, लिटिल मास्टर सुनील गावस्कर, रवी शास्त्री, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि अशा अनेक मुंबईच्या खेळाडूंचं हे माहेरघर. मुंबईतील याच प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला आज 19 जानेवारी 2025 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अनेक ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार झालेल्या या वानखेडे स्टेडियमची निर्मिती एका मराठी माणसाच्या अपमानातून झाली आहे. ती कशी झाली, जाणून घ्या रंजक गोष्ट.
एक अविस्मरणीय संध्याकाळ…
कसा झाला वानखेडेचा जन्म :
मुंबईतील सध्या प्रसिद्ध असलेलं वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होतं. वानखेडे स्टेडियमच्या आधी मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असलेल्या या स्टेडियमवर खेळले जायचे. त्या काळी ते खूप प्रसिद्ध स्टेडियम होतं. स्वातंत्र्यानंतर 1948 नंतर 1973 पर्यंत भारतात होणारे क्रिकेट सामने हे याच ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जायचे. ब्रेबॉर्न स्टेडियम हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं होतं. मात्र याच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन (आताचं मुंबई क्रिकेट असोसिएशन) यांच्यात वादातून या वानखेडे स्टेडियमचा जन्म झाला.
मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम :
मुंबईमध्ये 70 च्या दशकात BCA क्रिकेटचा कारभार सांभाळणारी संस्था होती. बीसीए (BCA) म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन. ज्याला आता (MCA) म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणतात. सीसीआय आणि बीसीएमध्ये अजिबात सामंजस्य नव्हतं. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या वेळी सीसीआय आणि बीसीए यांनी स्टेडियममधील जागा कशा वाटून घ्याव्यात, याच्यावर नेहमी वाद व्हायचे. यात खटके वाढू लागल्यानंतर बीसीएनं नवं स्टेडियम बांधायचं ठरवलं अन् ते फक्त ब्रेबॉर्न स्टेडियमपासून 500 मीटर अंतरावर. पण खरंतर वानखेडे स्टेडियम उभं राहिलं ते मराठी माणसाच्या अपमानातून.
काय झाला वाद ..
बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे 1972 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. विदर्भात जन्मलेले वानखेडे हे क्रिकेटप्रेमी होतेच पण बीसीएचे अध्यक्षही होते. दरम्यान त्यांच्याकडे काही तरुण आमदार एका सामन्याचा प्रस्ताव घेऊन आले. क्रिकेटप्रेमी असलेल्या शेषराव वानखेडे यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्याचं ठरवलं. मात्र त्यावेळेस सीसीआयचे अध्यक्ष होते ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट. वानखेडेंसह आमदारांचं शिष्टमंडळ मर्चंट यांची भेट घेण्यासाठी गेलं खरं पण मर्चंट यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. शब्दाला शब्द लागला आणि वातावरणही गरम झालं. विजय मर्चंट यांचा नकार ऐकून क्रिकेटप्रेमी वानखेडे म्हणाले, तुम्ही जर अशीच अरेरावी केली तर आम्हाला बीसीएकरता दुसरं स्टेडिमय उभारावं लागेल. मात्र पुन्हा नव्या स्टेडिमयसाठी नव्या जागेचा प्रश्न आलाच. आता चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशनदरम्यान रेल्वे लाईनच्या पश्चिमेला एख भूखंड खेळण्याकरता राखीव ठेवल होता, जिथं त्यावेळी हॉकी खेळलं जायचं.
13 महिन्यांत बांधलं वानखेडे स्टेडियम
मुंबईत नवं स्टेडियम बांधण्याच्या विषयावरुन शेषराव वानखेडे हे लगेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या भेटीला गेले. नवं स्टेडियम बांधण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याचं मुख्यमंत्री नाईक यांनी सांगितलं. यावर वानखेडे म्हणाले, तुम्ही फक्त स्टेडियम बांधणीसाठी होकार द्या बाकी सर्व मी पार पाडतो. यानंतर वानखेडे यांनी देणग्या मिळवायला सुरुवात केली आणि फक्त 13 महिन्यात बीसीएनं सीसीआयच्या नाकावर टिचून नवं स्टेडियम बांधलं. पण भूखंड छोटा असल्यामुळं रचना थोडी तडजोडीची झाली. यामुळं जर आपण नीट पाहिलं तर कळतं की स्टेडियम हे अगदी रेल्वेरुळांना खेटून आहे. यानंतर अखेरीस शेषराव वानखेडेंनी घेतलेल्या परिश्रमामुळं स्टेडियमला त्यांच नाव देण्यात आलं.
इतरही अनेक कार्यक्रम
वानखेडे स्टेडिमयवर फक्त क्रिकेटच नाही, तर इतरही काही कार्यक्रम पार पाडले आहेत. यात रिलायन्सच्या वार्षिक सभा, 1990 मध्ये डायमंड किंग भरत शाहा यांनी आपल्या मुलीचं लग्न वानखेडे स्टेडियमवर केलं होतं. भरत शाह यांनी या लग्नासाठी राजस्थानी राजवाड्याचा सेट उभारला होता. तसंच याच स्टेडियमवर 2014 मध्ये भाजपाचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळाही मोठ्या थाटात पार पडला होता