रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्देशानुसार विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दुर्बल घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे दिनांक 5 ऑक्टोबर रोजी महाशिबिराचे आयोजन करण्यांत आले आहे.
शिबिराच्या नियोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस गोसावी यांनी काल बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश निखिल गोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
महाशिबिराचे आयोजन माहे ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करावयाचे आहे. या महाशिबिराच्या माध्यमातून जनतेला त्यांचे हक्क व अधिकार प्रत्यक्ष मिळावेत, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे महाशिबिर राबविण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग बँका पोस्ट ऑफिस यांचे मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या शिबिरात उपलब्ध होणार आहे.
या याच अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन, या महाशिबिराचे नियोजन स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने यासाठी अवलंबावयाची कार्यपद्धती स्पष्ट केली. त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री गोसावी यांनीही या महाशिबिराचा उद्देश स्पष्ट केला. या महाशिबिराच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचे स्टॉल्स उभारुन त्याद्वारे लोकांना मार्गदर्शन करावे व जिल्ह्यातील जनतेने केंद्र व राज्य शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.