अहमदनगर- पुढची पिढी देशाच्या स्वातंत्र्यात जगणार की हुकूमशाहीत जगणार, हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. भाजपवाल्यांनी ज्यांच्यावर ‘भ्रष्ट’ म्हणून चिखल उडवला, त्यांचीच धुणीभांडी करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षातील नेत्यांना भाजपने फोडले आहे. यावरुनही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला.’फोडणवीस’ गृहमंत्री नाही, ‘घरफोडे’ मंत्री! ते दुसऱ्यांची घरे फोडून, स्वतःची घरे भरतायत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रे सुरु असून आज त्यांनी संगमनेर येथे संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आता घराणेशाहीवर टिका करताय मग युती करायला घरी आलात, तेव्हा ठाकरे घराण्याची परंपरा माहित नव्हती का? असा प्रश्न त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचाला आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांनी मोदींना वाचवलं होतं, त्यांच्याच शिवसेनेचा भाजपनं घात केला. हा घात मी सहन करणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
संकटात साथ देणारे ‘फरिश्ते’ , माझी जनता माझ्यासाठी ‘फरिश्ते’…
माझ्या शेतकऱ्याला इथं झोप लागत नाही आणि तुम्ही मोदींचं स्वप्न पूर्ण करायला निघालात? असा प्रश्न त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला विचारला आहे. या वेळी त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन देखील केले. सुखामध्ये साथ देतात ते ‘रिश्ते’ असतात, संकटात साथ देणारे ‘फरिश्ते’ असतात. माझी जनता माझ्यासाठी ‘फरिश्ते’ असल्याचेही ते या वेळी म्हणाले. भाजप संविधान मानत नसेल, तर संविधानाची ताकद काय असते हे दाखवण्याची वेळ आली असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.