शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?:NCP अजित पवार गटाला मिळाल्यामुळे रंगली चर्चा, पण सुप्रिया सुळे यांनी फेटाळली…

Spread the love

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंबंधीचा एखादा ठोस निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज किंवा उद्या यासंबंधीचा निर्णय घेणार असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व राज्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी मंगळवारीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी आपल्या गटाच्या खासदार, आमदार व नेत्यांची बैठक बोलावल्यामुळे या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. शरद पवार गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वीच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीचा ठोस निर्णय शरद पवार आज किंवा उद्या घेतील असा दावा केला जात आहे. शरद पवार यांनी बुधवारी सकाळी आपल्या गटाच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला शरद पवार गटाचे सर्वच खासदार व आमदारांसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली, असा दावा केला जात आहे.

सुप्रिया सुळेंनी चर्चा फेटाळली..

दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा धुडकावून लावली आहे. मला यासंबंधीच्या कोणत्याही चर्चेची माहिती नाही. विशेषतः मंगलदास बांदल यांनी असे एखादे विधान केले असेल, तर त्यांच्यावर पक्षात कोणती जबाबदारी आहे हे मला आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. आजच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक व महाआघाडीत आम्हाला मिळणाऱ्या जागांवर चर्चा झाली. तसेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे कोणते नेते महाराष्ट्रात प्रचाराला येणार यावरही आम्ही खल केला. विशेषतः जागावाटपाच्या आगामी बैठकीत काँग्रेसतर्फे कोण सहभागी होणार यावरही आमची सल्लामसलत झाली, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात चिन्हासाठी कोर्टात जाणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत. निवडणूक आयोगाने आमचा पक्ष व चिन्ह हिसकावून दुसऱ्यांना दिला. हे चुकीचे आहे. याला आम्ही अन्याय म्हणणार नाही. कारण, आम्ही आमच्यावर अन्याय झाला असे म्हटले तर आम्ही दुबळे झाल्याचा संदेश जाईल. त्यामुळे आम्ही या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला चुकीचे म्हणत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्य सरकार अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना केला.

मंगलदास बांदल यांच्या विधानाने चर्चेला सुरुवात..

दुसरीकडे, शरद पवार गटाचे पदाधिकारी मंगलदास बांदल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण ही चर्चा सुरू आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच सर्वांना कळेल, असे त्यांनी म्हटले होते. यामुळेही शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसला मिळणार उभारी?..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेस पुरती हादरली आहे. त्यातच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसला राज्यासह देशात मोठी उभारी मिळण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व अन्य बड्या नेत्यांनी मंगळवारीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी आपल्या गटाच्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मिळत आहे. याची पुष्टी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या गटाच्या एखाद्या मोठ्या अद्याप केली नाही. पण राज्याच्या राजकीय वर्तुळात ही चर्चा चांगलीच रंगली आहे हे मात्र खरे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page