*कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.*
*रत्नागिरी :* कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. तब्बल 15 तास उलटल्यानंतरही अजूनही कोकण रेल्वे ठप्पच आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. खेड-दिवाणखवटी मार्गावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
*🔹️कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प , ट्रॅकवर माती आणि चिखल :*
दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अति मुसळधार पावसामुळे कामात अडचणी येत आहेत. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल साचलेला आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्या इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. काही गाड्या रविवारपासूनच रेल्वे स्थानकात थांबून ठेवण्यात आल्या आहेत.
*या गाड्या रद्द :*
कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,
▪️ दिवा- रत्नागिरी गाडी,
▪️मडगाव जंक्शन-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस,
▪️सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्सप्रेस,
▪️मंगळुरु जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना वेळापत्रक आणि ट्रेनचं स्टेटस पाहूनच बाहेर पडावं, असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
*🔹️इतर मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या*
▪️पाटणा – वास्को द गामा एक्स्प्रेस ही गाडी कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा-मडगाव मार्गे वळविण्यात आली.
▪️लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस ही गाडी कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर मार्गे वळविण्यात आली आहे.
▪️गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्स्प्रेस ही विन्हेरे गाडी कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.
▪️हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्स्प्रेस ही गाडी कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू मार्गे वळविण्यात आली आहे.
▪️लोकमान्य टिळक -तिरूवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस कल्याण लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन – एर्नाकुलम मार्गे वळविण्यात आली आहे.
*🔹️रेल्वे स्थानकात थांबून असलेल्या गाड्या*
▪️मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही रविवारी सायंकाळपासून खेड येथे थांबून आहे.
▪️सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस ही काल सायंकाळपासून दिवाणखावटी येथे थांबून आहे.
▪️मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी येथे काल सायंकाळपासून थांबून आहे.
▪️मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस ही देखील काल सायंकाळपासून रत्नागिरी स्थानकात थांबून आहे.