मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. ताप, घशाचा संसर्ग अन् पांढऱ्या पेशा घटल्यामुळे मंगळवारी दुपारी ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले. तिथे विविध तपासण्या केल्यानंतर ते 3 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.
एकनाथ शिंदे 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांना 105 डिग्री ताप आला होता. त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली होती.
रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर शिंदेंनी पत्रकारांशी संक्षीप्त संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आता माझी तब्येत बरी आहे. मी चेकअपसाठी येथे आलो होतो.
दुसरीकडे, डॉक्टरांनी खबरदारी म्हणून एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणीही केली आहे. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी – जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. या आजारपणामुळे शिंदेंनी घराबाहेर पडणे टाळले होते. दुसरीकडे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसोबत आझाद मैदानावर पाहणी केली.
कामामुळे प्रकृती खराब होणं सहाजिक- देसाई
शंभुराज देसाई म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची तब्बेत खराब झाली आहे. त्यांना ताप, कफ झालेला आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून गेली 2 अडीच वर्षे त्यांनी दिवसरात्र काम केले आहे. निवडणुकीच्या वेळेस त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शरीरावर इतका ताण दिल्यानंतर थोडासा थकवा येणं प्रकृती खराब होणं सहाजिक आहे.
शपथविधी तयारीसाठी भाजपची आढावा बैठक-
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या शपथविधीसाठी तयारीची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधीसाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.