अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवतारेंना बारामतीतून माघार घेण्याची विनंती केलीय. मात्र, शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय.
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढलीय. तसंच वेळ पडल्यास अपक्ष लढण्यापेक्षा कमळ चिन्हावर लढण्यास तयार असल्याचंही ते म्हणालेत. त्यामुळं महायुतीतील द्वंद उफाळून येत आहे. असं असतानाच आता अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची भेट घेतली.
अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?..
विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळं महायुतीची गोची झाल्याचं दिसून येतंय. शिवतारे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. तरीही शिवतारे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशानं अजित पवार गटाचे नेतेही आक्रमक झालेत. “माणसाच्या मनस्थितीवर परिणाम झाला की अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात,” असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विजय शिवतारे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. शिवतारे यांना समज द्या, नाहीतर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, अशा प्रकारचे विधानंही अजित पवार गटाच्या नेत्यांकडून येत आहेत.
शिवतारे यांची पोस्ट…
विजय शिवतारे यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेयर केलीय. ‘बारामती लोकसभेतील जनतेचं ठरलंय. आम्ही लढणार आणि जिंकणार’ असं कॅप्शन असलेली पोस्ट शिवतारे यांनी शेयर केलीय. त्यामुळं निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर विजय शिवतारे हे ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
विजय शिवतारेंची अजित पवारांवर टीका…
विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तसंच “बारामती मतदारसंघात मतदार पवारांच्या विरोधात आहेत. ज्यांना पवारांना मतदान करायचं नाही, त्यांना लोकशाही अधिकार देण्यासाठी ‘मी’ बारामतीची निवडणूक लढवणार आहे. लोकांच्या आग्रहामुळं मला उभं राहावं लागतंय. पवार घराण्याला अनेकजण कंटाळले आहेत”, असंही ते म्हणाले.
दत्तात्रय भरणेंनी केली ‘ही’ मागणी…
शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रविवारी (24 मार्च) इंदापूरचे आमदार आणि अजित पवारांच्या जवळचे समजले जाणारे दत्तात्रय भरणे यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दत्तात्रय भरणे यांनी विजय शिवतारे यांना बारामतीतून माघार घ्यावी, अशी विनंती केलीय.