अरुणाचल प्रदेश म्हणजे भारतीय अखंडतेचं प्रतीक; परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला फटकारलं, म्हणाले जगाची दिशाभूल करू नका!…

Spread the love

अरुणाचल प्रदेश भारतीय धोरणात्मकता आणि अखंडतेचं प्रतीक; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनला फटकारलं, म्हणाले जगाची दिशाभूल करु नका..

सिंगापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अरुणाचल प्रदेशवर चीनकडून करण्यात येत असलेले दावे फेटाळले आहेत. अरुणाचल प्रदेश हे भारतीय धोरणात्मकता आणि अखंडतेचं प्रतीक असल्याचं सांगत त्यांनी चीन सरकारचे दावे फेटाळून लाववले.

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अरुणाचल प्रदेशवर चीनकडून करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा नैसर्गिक भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या जयशंकर तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनला फटकारलं. चीनची रणनीती उद्ध्वस्त करताना जयशंकर म्हणाले की, चीननं आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार केला आहे. हा दावा आमच्यासाठी नवीन मुद्दा नाही.

कराराचं उल्लंघन…

दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, “आज भारतासमोर एक मोठं आव्हान आहे. दोन उदयोन्मुख शक्तींमध्ये शाश्वत समतोल कसा राखता येईल? हे शेजारी देश आहेत. त्यांचा इतिहास आणि लोकसंख्या इतर जगापेक्षा वेगळी आहे. जयशंकर यांनी मे 2020 मध्ये पँगॉन्ग सरोवराजवळील सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक चकमकीबद्दल सांगितलं. 2020 मध्ये चीनच्या सीमेवर असं काही घडलं, ज्यामुळं भारताला खूप आश्चर्य वाटलं. कारण ते दोन्ही देशांनी केलेल्या करारांचे पूर्णपणे उल्लंघन करत होते.”

प्रत्येकाला हवे ‘स्थिर शेजारी’…

भारताच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, “प्रत्येक देशाला स्थिर शेजारी हवे असतात. दुसरे काही नाही. मात्र, दुर्दैवानं भारताच्या बाबतीत असं होत नाही.” परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा ‘पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादाचं प्रायोजकत्व करतं’ असा उल्लेख करुन चिंता व्यक्त केली. पुढे परराष्ट्र मंत्री म्हणाले, “जो शेजारी दहशतवादाचा वापर हा कारभाराचं साधन म्हणून करतो, त्याच्याशी तुम्ही कसं वागणार? आम्हाला सामोरं जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. जेणेकरुन समस्या टाळता येईल. भारत आता दहशतवाद्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत नाही,” असं म्हणत जयशंकर यांनी पाकिस्तानच्या नवीन सरकारला इशारा दिला.

पंतप्रधानांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चिडला होता चीन..

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचं उद्घाटन केलं होतं. या भेटीदरम्यान चीननं याला तीव्र विरोध दर्शवला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत निषेध नोंदवला होता. चीनचे प्रवक्ते वेनबिन म्हणाले होते की, “चीन सरकारनं अरुणाचल प्रदेशला कधीही भारताचा भाग मानलं नाही.” त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानंही अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो नेहमीच तसाच राहील, अशी ठासून प्रतिक्रिया दिली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page