
अहमदाबाद- इंडियन प्रीमियर लीग-2024 च्या 5 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 6 धावांनी पराभव केला. मुंबईने सलग 11व्यांदा हंगामातील पहिला सामना गमावला आहे. सलामीच्या सामन्यात संघाचा शेवटचा विजय 2012 च्या मोसमात होता. तेव्हा संघाने सीएसकेचा पराभव केला होता.
रविवारी रात्री अहमदाबादमध्ये 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकांत 9 गडी बाद 162 धावाच करता आल्या. तत्पूर्वी, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या. साई सुदर्शनने 45 आणि कर्णधार शुभमन गिलने 31 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहने 3 बळी घेतले. गेराल्ड कुटीजने 2 बळी घेतले. पियुष चावलाच्या खात्यात एक विकेट आली.
मुंबईसाठी डेवाल्ड ब्रेव्हिसने 46 आणि रोहित शर्माने 43 धावा केल्या, पण आपल्या संघाला मोसमातील पहिला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या दोन षटकांमध्ये स्पेन्सर जॉन्सन आणि उमेश यादव यांनी अप्रतिम गोलंदाजी करत 2-2 बळी घेतले. या दोघांपूर्वी मोहित शर्मा आणि अजमतुल्ला उमरझाई यांनीही 2-2 विकेट घेतल्या होत्या.