मुंबई : देवेंद्रजी सहाव्यांदा आमदार झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण त्यासोबतच खूप जबाबदारीही त्यांच्यावर आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. देवेंद्रजींच्या मेहनतीला यश मिळाल्याचा मला आनंद आहे. महायुती आता एकत्रित आहे. महायुतीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाटचाल चालू केलेली असल्याचे त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांचे जीवन संघर्षमय राहिलेले आहे. त्यांनी मोठा संघर्षाचा काळा पाहिलेला आहे. त्यांनी काही करायचे ठरवले, तर ते करून दाखवतात. जिद्द आणि चिकाटीमुळे देवेंद्रजी आज या ठिकाणी आहे. देवेंद्रजींना महाराष्ट्रासाठी बरीच कामे करायची आहे. आपल्या सर्वांना त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
लाडकी बहीण योजना एक चांगला प्रकल्प आहे. साऱ्या बहिणी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीसोबत जोडल्या गेल्या. संसदेत आणि राजकारणात महिलांचे प्रमाण अधिक असावे यासाठी बिल मंजूर झाले आहे, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
जनतेच्या आणि स्वत:च्या विश्वासामुळे ते पुन्हा आले..
देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरून विरोधकांनी टीका केली होती. यावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केले. आपल्याला काही प्राप्त करायचे तेव्हा आपल्याला अर्जुनासारखे एकच लक्ष असले पाहिजे. ते पुन्हा येतील याबाबत लोकांना आणि देवेंद्रजींना विश्वास होता. देवेंद्रजी महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील, ते इतर कुणीही करू शकणार नाही. या विश्वासामुळे ते पुन्हा आलेले आहेत, असे अमृता म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांची मेहनत, दूरदृष्टी आणि व्हिजन पाहून त्यांना पुन्हा यायचे होते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. बहिणींसाठी, शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांना पुन्हा यायचे होते. अधिक गुंतवणूक, परकीय गुंतवणूक यातील काम पाहून ते पुन्हा येतील असे वाटले होते, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
मुख्यमंत्रीपदाबाबत विचार केला नव्हता…
23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मी देवेंद्रजींना मुख्यमंत्री पद भेटेल की नाही याबाबत विचार केला नव्हता. त्यांनी आपल्या कामाचे चीज करून दाखवले. पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणतेही पद मिळाले असते, तरी त्यांनी लोकसेवाच केली असती, असे अमृता फडणवीस म्हणाल्यात.
उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका..
2019 मध्ये भाजपसोबत धोका झाला होता तेव्हा पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की जद में हूँ मौसम जरा बदलने दे, असे ट्वीट केले होते. आज तो मौसम बदलला आहे. आम्ही त्या परिस्थितीतूनही अव्वल क्रमांकाने बाहेर पडलो आहोत, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.