चिपळूण :- कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन, श्रीफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्योग वाढीसाठी पुढे येत आहे. अवघ्या महिनाभात कोका कोलाला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या, यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्योगांसाठी महाराष्ट्र ‘रेड कार्पेट’ टाकून तयार आहे.
या कंपनीत २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. कोकणच्या जनतेने नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. परंतु, काही लोकांनी केवळ राजकारण केले, उद्योग आणले नाहीत. कोकाकोला प्रकल्प मोठा आहे. महाराष्ट्रात यापुढेही उद्योग येतील. कोकणाला विकासाकडे न्यायचे आहे. प्रगतीकडे न्यायचे आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले पाहिजेत. गुंतवणुकीच्या पसंतीसाठी महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे राज्यात विकास उद्योग वाढतो आहे. कोकणातील समुद्र किनारा समृद्ध आहे, यामुळे पर्यटन आणि उद्योग वाढीला चालना मिळेल. मुंबई गोवा ग्रीन फिल्ड रस्ता तयार करतोय. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यामतुळे त्यासाठी लवकरच कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.