
*रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन 2024-25 मध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 6 हजार 152 दोषी वाहनांवर कारवाई करुन रु. 2 कोटी 60 लक्ष 73 हजार दंड व कर 77 लाख 36 हजार इतके वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली. रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.*
वायुवेग पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते आणि तपासणी दरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन कारणाऱ्या दोषी वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. कार्यालयामार्फत सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात एकूण ६ हजार १५२ दोषी वाहनांवर कारवाई करुन रु. 2 कोटी 60 लाख 73 हजार दंड व कर रु. 77 लाख 36 हजार इतके वसूल केलेली आहे.
सर्वाधिक दंडवसुली मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलर इत्यादी वाहनांकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये ३९५ ओव्हरलोड वाहनांकडून रु. १ कोटी ११ लक्ष १५ हजार इतकी दंडवसुली तर, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या ३१७ प्रवासी बस, रिक्षा यांच्याकडून रु. 30 लाख 25 हजार लाख इतकी दंडवसुली करण्यात आलेली आहे. ४९ दोषी स्कूलबस वाहनांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे.
यासोबत गुन्हेनिहाय विना हेल्मेट १७५१ वाहने, विना सीटबेल्ट- १८६ वाहने, ओव्हरस्पीड -११७३ वाहने, ट्रिपल सीट १९७ वाहने, गाडी चालविताना मोबाईलचा वापर ३६८, विना विमा प्रमाणपत्र -८७२, वाहनामध्ये विना परवानगी बदल करणे -२०, रिफ्लेक्टरशिवाय चालणारी वाहने- ५००, विना अनुज्ञप्ती वाहन चालविणे- ३२६, योग्यता प्रमाणपत्र संपलेली वाहने – ९००, पीयुसी नसताना वाहन चालविणे- ७३२, इत्यादी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावर्षी देखील अधिकाअधिक दोषी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.