मध्य प्रदेशच्या राजधानीत अग्नितांडव! मंत्रालयाला भीषण आग, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश…

Spread the love

मध्य प्रदेशातील सर्वात महत्त्वाची प्रशासकीय इमारत असलेल्या वल्लभ भवनला शनिवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशातील अनेक मंत्रालयं या इमारतीत कार्यरत आहेत. आग विझवताना अग्निशमन दलाचे 5 जवानही इमारतीत अडकले.

भोपाळ- मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील मंत्रालयात भीषण आग लागलीय. मंत्रालय परिसरातील वल्लभ भवनच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागलीय. शनिवारी सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना तिसऱ्या मजल्यावर धूर येत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ वल्लभ भवनच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला माहिती दिली. याची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीनं घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान अडकले…

मध्य प्रदेशची प्रशासकीय इमारत वल्लभ भवनमध्ये अनेक मंत्रालये कार्यरत आहेत. त्यामुळं ही इमारत मंत्रालय म्हणून ओळखली जाते. येथील जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीच्या मागे नवीन इमारत बांधण्यात आलीय. सरकारी सुट्टी असल्यानं आज वल्लभ भवनात कर्मचारी फारच कमी येतात. शनिवारी सकाळी केवळ स्वच्छता कर्मचारी घटनास्थळी होते. त्यावेळी एका कर्मचाऱ्यानं प्रथम धूर निघताना पाहिला. माहिती मिळताच अग्निसुरक्षा तज्ज्ञ पंकज खरे हेही घटनास्थळी पोहोचले. तिसऱ्या मजल्यावरुन सुरू झालेली आग काही क्षणांत चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग विझवताना अग्निशमन दलाचे 5 कर्मचारीही या इमारतीत अडकल्याचं सांगण्यात येतंय.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश …

सफाई कर्मचारी विशाल खरे म्हणाले, सकाळी साडेनऊ वाजता ते मंत्रालयाच्या गेट क्रमांक 5 आणि 6 समोर स्वच्छता करत होते. त्याचवेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन धूर येत असल्याचं पाहून ते घाबरले. त्यांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला फोन केला. नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही वेळानं अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या. ही वल्लभ भवनची जुनी इमारत आहे. मात्र या आगीमुळं किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच पुन्हा अशी घटना होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेणार असल्याचं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलंय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page