
मुंबई- महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र आता पुढील काही दिवसांत उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं काही दिवसांत तापमानात वाढ होऊ शकते.
मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. अनेक ठिकाणी ढगांच्या कडकडासह पाऊस झाला होता. त्यामुळं अनेक पिकांची नासाडी झाली आहे. काही वेळ पाऊस पडल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा उकाडा वाढला आहे. वातावरण बदलाचा परिणाम म्हणून हवामानात उलथापालथ होत आहे. शनिवारी मुंबईत उष्ण वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तसंच, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र परिसरावर चक्राकार वारे, नैऋत्य मध्ये प्रदेशापासून दक्षिण अंतर्गंत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. त्यामुळं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. जिल्ह्यातील काही भागांत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.