अहमदनगर- अहिल्यानगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने श्रीगोंदा या मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली होती. मात्र पाचपुते यांना त्यांच्या मुलाला विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. असे असले तरी देखील भाजप प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर ठाम होते. परंतु, आता या निर्णयात बदल करत उमेदवार देखील बदलला जाण्याची शक्यता आहे.
बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते हे रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच पाचपुते दाम्पत्याने आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले होते. मात्र तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार बदलण्यास नकार दिल होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुलाच्या उमेदवारीसाठी पाचपुते दाम्पत्य लॉबिंग करण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवार बदलला तर काही फरक पडणार नसून उलट मतांची संख्या वाढेल, असा विश्वास देखील बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाकडून सुवर्णा पाचपुते उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र त्यांना पक्षाकडून संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सुवर्णा पाचपुते यांनी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांना उमेदवारी दिली, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे आता उमेदवारी बदलून विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी दिल्यास सुवर्णा पाचपुते काय भूमिका घेणार, याकडे देखील लक्ष असणार आहे.
महायुतीमध्ये असे चित्र असतानाच तिकडे महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस पक्षात देखील बंडखोरी सुरू आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधील राहुल गांधींच्या युवा ब्रिगेडमधील डॉ. जिशान हुसेन यांनी बंडखोरी केली आहे. ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेत पक्षाला आव्हान दिले आहे.