देवरुख:-भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पंचक्रोशीत मताधिक्य घटले अशा आशयाची बातमी वाचनात आली परंतु ही बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून शेखर सरांना मताधिक्य मिळण्यासाठी मेहनत केली. सरांना संगमेश्वर तालुक्यातूनच मताधिक्य मिळाले. यात भाजपाचा वाटा नाही का? असा सवाल भाजपा चे तालुका अध्यक्ष श्री रुपेश कदम यांनी केला आहे.
याबद्दल बोलताना श्री कदम पुढे म्हणाले की… “चिपळूण तालुक्यात अनपेक्षितपणे सरांना आघाडी मिळाली नाही. पण ती सगळी पिछाडी संगमेश्वर तालुक्याने भरून काढून विजयी आघाडी दिली यात भाजपाचाही मोठा वाटा होता. भाजपाची ताकद वाढली नाही असे म्हणणाऱ्यांनी जरा आत्मपरीक्षण करावे. ज्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पंचक्रोशीत मताधिक्य मिळाले नाही अशी अफवा उठवून महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांनी एकच विचार करावा की या अगोदर त्याच पंचक्रोशीत भाजपचे पूर्वी किती अस्तित्व होते? अपेक्षित नसले तरी चांगले मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळाले आहे. आम्ही हे मताधिक्य वाढवण्यासाठी अजूनही मेहनत करू असेही कदम यांनी सांगितले.
महायुतीला अपेक्षित मताधिक्य मिळाले नसले तरीही आमचा उमेदवार विजयी झाला आहे. काल विजय मिळवल्यानंतर आमचे उमेदवार आमदार श्री शेखर निकम यांनी आत्मपरीक्षण करावे लागेल असे मताधिक्य मिळाल्याचे भाषणात नमूद केले. सरांनी संगमेश्वर तालुक्याचे विशेष आभारही मानले. त्यामुळे महायुतीचे चांगले चाललेले बघू शकत नसाल तर किमान आमच्यात मिठाचा खडा टाकू नका असा इशारा रुपेश कदम यांनी दिला आहे.