
देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या बिबट्याचा वन्यप्राण्याशी झटापटीत व उपासमारीने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातीव फणसस्टाँप येथे मृत बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांमार्फत वनविभागाला मिळाल्यावर रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली व पंचनामा केला तसेच मृत बिबटयाला ताब्यात घेतले. ही कारवाई वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, सूरज तेली, अरूण माळी यांनी केली. यानंतर दाभोळे येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनाली शेट्ये यांच्यामार्फत या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
या बिबट्याच्या अंगावर जखमा असल्याने या बिबट्याची वन्यप्राण्याशी झटापट झाली असावी यात त्याची लढण्याची ताकद संपुष्टात आल्याने तसेच उपासमारीने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनपाल तौफीक मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. हा बिबट्या नर जातीचा असून तो एक ते दिड वर्षाचा असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. वनविभागामार्फत या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हातीवमध्ये बिबट्याचा वावर वाढला होता. असे बोल ग्रामस्थांमधून उमटत होते. हा बिबट्या रात्री व पहाटे रस्त्यावर अनेक वाहनचालकांना अचानक दर्शन देत असल्यामुळे वाहनचालकांची पाचावर धारण बसत होती. मात्र आता रविवारी हातीव येथेच बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने वाहनचालकांना दिसणारा तो बिबट्या हा तर नव्हे ना? अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. तालुक्यात बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे बिबट्या भक्षाच्या शोधात मानवी वस्तीत येवू लागला आहे. ही चिंतेची बाब आहे.