रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण. यानिमित्त बापूसाहेबांना वंदन करतो. रत्नागिरीच्या विकासाकरिता त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून काम केले. त्यांच्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भाजपाच्या कमळ निशाणीवर नारायण राणे हेसुद्धा निवडून आले. या साऱ्यांची प्रेरणा, आशीर्वाद घेऊन मार्गक्रमणा करत आहोत, रत्नागिरीच्या विकासाकरिता कटिबद्ध राहणे ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार बाळ माने यांनी केले.
लक्ष्मी चौक परिसरातील परुळेकर यांच्या निवासस्थानी आज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळ माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी बापूसाहेबांचे सुपुत्र अॅड. बाबासाहेब परुळेकर, अॅड. निनाद शिंदे, गुरु शिवलकर, विक्रम मयेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे उपस्थित होते.
या वेळी बाळ माने म्हणाले की, बापू जनसंघामध्ये 1952 पासून सक्रिय होते. आणीबाणीनंतर जनता पक्षातून ते 1977 आणि 1980 मध्ये खासदार झाले. 96 वर्षी 27 जुलैला त्यांचे निधन झाले. आज तिथीनुसार त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात भाजपाचे काम करताना अॅड. बाबासाहेब परुळेकर व आम्ही एकत्र असतो. विधीज्ञ म्हणून बापूसाहेबांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आहे. कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक होते. त्यांच्याच मार्गाने प्रवास करत आहोत. कोकणात, रत्नागिरीमध्ये भाजपाला चांगले दिवस यावेत. बापूसाहेबांनंतर कमळ निशाणीवर खासदार नारायण राणे विजयी झाले. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असून त्यांची प्रेरणा, आशीर्वाद घेऊन मार्गक्रमणा करत राहू, ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल.
वकिलीचा वारसा बापूंनी मोठा कसोशीने जपला. शिस्त, व्यासंग, मेहनत, आवाजावर हुकुमत, विरोधी मताबद्दल कमालीचा आदर या सर्वांमुळे वकिली व्यवसायात बापूंनी आदर्श निर्माण केला. बापूंनी जवळपास 60 वर्षे वकिली व्यवसाय केला. सावरकर हा जगण्याचा आणि विचाराचा विषय आहे, असं ते नेहमी सांगत. ते जनसंघात सक्रिय होते. उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती यांच्या जोरावर त्यांनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून मोहोर उमटवली. बापूंनी नगरपालिका, संसद, रत्नागिरी शिक्षण संस्था, पतितपावन मंदिर आदि संस्थांमध्ये स्वतःची वैचारिक भूमिका घेऊन काम केलं. 1980 मध्येही ते खासदार झाले, असेही बाळ माने यांनी याप्रसंगी सांगितले.