
रत्नागिरी : “भारतीय जनता पक्षाने गेल्या दीड वर्षांपासून ‘गाव चलो, घर चलो अभियान’, ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या अभियानाअंतर्गत लोकसभा निवडणुकीची तयारी केली. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे बूथकमिट्या पूर्ण करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ कोट्यवधी जनतेला मिळाला आहे. त्यामुळे हे सर्व मतदार भाजपाला मतदान करतात. या सर्व योजनांची माहिती व विकासयोजनांची माहिती देणारी पत्रके घरोघरी वाटल्यामुळे यावेळेस मतदारांमध्ये उत्साह असून महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा विश्वास भाजपाचे लोकसभा सहप्रभारी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी व्यक्त केला. ‘रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ४० हजारांचे मताधिक्य देऊ,’ असा दावाही त्यांनी केला.

रत्नागिरी शहर, मिऱ्या, मिरजोळे, कुवारबाव यासह विविध ठिकाणच्या महायुतीच्या बूथवर श्री. माने यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाईंसह अन्य पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित प्रचार करत होते. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची विराट सभा रत्नागिरीत झाली. त्याचा चांगला परिणाम मतदारांवर झाला असून, महायुतीचा माहोल तयार झाला.”

गाव चलो घर चलो अभियानासंबंधी बोलताना श्री. माने म्हणाले, “वरिष्ठांच्या आदेशानुसार हे अभियान सुरू केले. लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही आधीपासूनच नियोजन केले. कमळाच्या निशाणीवर उमेदवार मिळणे ही महत्त्वाची गोष्ट होती. महायुतीतील वरिष्ठांनी त्याबाबत निर्णय घेतला आणि नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.

प्रचारासाठी दिवस कमी होते..
परंतु घरोघरी कमळ व मोदी सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही वर्षभर मेहनत घेत होतो. मेरा बूथ सबसे मजबूत, बुथ जितेगा चुनाव जितेगा या तत्त्वानुसार बूथ कमिटी करण्यात आली. त्यांच्या बैठका घेतल्या, आपण मतदानात काय केले पाहिजे, यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळपासून बूथवर भाजपा कार्यकर्ते पाहायला मिळाले. त्यांना महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्तेही मदतीला आले. त्यामुळे सर्व ठिकाणी बूथ लागले.”