कोल्हापूर :- कोरोना काळातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम पाहून जागतिक पातळीवर कौतुक झाले. परंतु ठाकरे सरकारच्या कामामुळे भाजपला पोटदुखी सुरू झाली. आणि त्यांनी ४० गद्दारांच्या साथीने सरकार पाडले, असा हल्लाबोल करून आता मुंबईतील मंत्रालय भाजप गुजरातमध्ये नेईल, असा खोचक टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारला लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.
अच्छे दिन आले आहेत का ?, महागाई कमी झाली आहे का ? १५ लाख कोणाच्या खात्यात आले आहेत का ? असा सवाल करून ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हिताचे सरकार आम्ही आणले होते. कोरोना काळात ठाकरेंचे काम जागतिक पातळीवर पोहोचले होते. २०२० – २१ मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने केली. या कामामुळे भाजपला पोटदुखी सुरू झाली. भाजपच्या या पोटदुखीला ४० गद्दारांची साथ मिळाली. आणि बापचोर, पक्षचोर असे ४० गद्दार फुटले, आणि राज्यात भाजपप्रणित खोके सरकार आले, असा हल्ला ठाकरे यांनी शिंदे गटावर चढवला.
खोके सरकारच्या काळात महाराष्ट्रातील फॉक्सकॉनपासून महानंद दूध प्रकल्प या सरकारने गुजरातला देऊन टाकले आहेत. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये नेले आहेत. आता मुंबईतील आमचे मंत्रालयही हे सरकार गुजरातला घेऊन जातील, असा खोचक टोला ठाकरे यांनी लगावला. महाराष्ट्रात नवं ३७० कलम लावले आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. राज्यातील अनेक प्रकल्प पूर्ण होऊन ही उद्घाटन केले जात नाही. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून घटनाबाह्य सरकारकडून पैशांची उधळपट्टी सुरू आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
जाहिरात