
३१ जुलै/मुंबई: श्री गणरायाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.