अदानी समूह आता कुठल्या वाटेने???

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०१, २०२३.

बाजार भांडवलात ४ लाख कोटींची घसरण आणि शेअर्समधील इतकी पडझड ही काही लहानसहान गोष्ट नाही. प्रतिष्ठेला धक्काही आहेच. अमेरिकेत येऊन अदानी समूहाने आमच्यावर खटला दाखल करावा, असे खुले आव्हानही हिंडेनबर्गने दिलेले आहेच. हिंडेनबर्गविरोधात अदानी हे अमेरिकेत खटला दाखल करणार की भारतात, याबाबतचा चेंडू अदानींच्या कोर्टात आहे. अर्थात काय खरे, काय खोटे ते सारे काही पटकन समोर येणार नाही. कायदेशीर प्रक्रिया दीर्घकाळ चालेल. खटला दाखल होणार, हे मात्र नक्की…

हिंडेनबर्गने आजवर ज्या कंपनीचे रिपोर्ट अशाप्रकारे बाहेर काढले आहेत, त्या कंपनीचे शेअर कोसळलेले आहेतच. आजवर अमेरिकेतही अनेक कंपन्यांना हिंडेनबर्गच्या अहवालाचा फटका बसलेला आहे. यापैकी बऱ्याच कंपन्यांचे ट्रॅक रेकॉर्ड पुढे काही महिन्यांनी सावरलेलेही आहे. अदानी जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावरून खाली घसरलेले असले तरी यादीत कायम आहेत, हेही दुर्लक्षिता येणार नाही.

अहवालामुळे सेबी सतर्क :

हिंडेनबर्गच्या आरोपांसंदर्भात तुम्ही सेबीकडे संपर्क केला आहे काय, या प्रश्नावर सोमवारी अदानी समूहाकडून नकार देण्यात आलेला असताना रॉयटर्सच्या वृत्तानुसार सेबी ही वित्तीय नियामक संस्थाही याप्रकरणी सतर्क झाली आहे. गतवर्षी अदानी समूहाकडून झालेल्या प्रत्येक व्यवहाराची सेबीकडून तपशीलवार चौकशी केली जाणार आहे. अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या अधिग्रहण व्यवहाराचाही यात समावेश आहे. हिंडेनबर्गच्या अहवालाचेही अध्ययन सेबीकडून केले जाईल.

अदानी समूहावर यापूर्वीही आरोप :

अदानींच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीची खोटी कागदपत्रे बनवून, खोटी उलाढाल दाखवून शेअर बाजारीतील नोंदणीकृत कंपन्यांचा पैसा या कंपन्यांत वळवला. शेअर बाजारात हेराफेरी करण्यासाठी आणि मनीलाँडरिंगसाठीही या शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला, असे आरोप हिंडेनबर्गने केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांना फटका बसला. यापूर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये न्यूयॉर्कमधील फिच ग्रुपच्या क्रेडिट साईटस् या युनिटने अदानी ग्रुपने फार जास्त कर्ज घेतले असून जर समूह दिवाळखोरीत गेला तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशारा दिला होता. भारत सरकार आणि बँका यांच्याशी अदानी समूहाचे चांगले संबंध असल्याचे या संस्थेने म्हटले होते. विशेष म्हणजे जुलै २०२१ मध्ये अदानी समूहातील काही कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांची चौकशी सेबीमार्फत सुरू आहे, अशी माहिती संसदेत दिली गेली होती. याचा काळात ब्लूमबर्गनेही अदानी समूहाच्या कार्यशैलीवर शंका व्यक्त केल्या होत्या.

हिंडेनबर्गचे आरोप काय?

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२० अब्ज ऑलर आहे. यातील १०० अब्ज डॉलरहून अधिक गेल्या ३ वर्षांतच झालेली वाढ आहे. त्यामागचे कारण समूहाच्या ७ लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमधील तेजी आहे. ही वाढही थोडीथोडकी नव्हे तब्बल ८१९ टक्क्यांची आहे.

अदानी कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शेल कंपन्यांची माहितीही अहवालात आहे. कॅरेबियन बेटांसह मारिशस ते संयुक्त अरब अमिरातीपर्यंत देशांत या कंपन्या आहेत. या सर्व शाखांचा वापर भ्रष्टाचार, मनी लाँडरिंग आणि करचुकवेगिरीसाठी केला जातो. लिस्टेड कंपन्यांनी या कंपन्यांचा वापर लांड्यालबाड्यांसाठी केला.

अहवाल तयार करताना अदानी समूहातील माजी वरिष्ठ अधिकार्यांसह अनेक संबंधितांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हजारो दस्तावेजांची छाननी करण्यात आली आणि जवळपास ६ देशांमध्ये जाऊन खरी परिस्थिती काय ते जाणून घेतले. मुखवटा असलेल्या कंपन्या मुखवटा आहेत, हे आम्ही समोर आणले.

अदानींचे शेअर ही एक गडबड आहे, कंपन्यांच्या लेखा परीक्षणातही सावळा गोंधळ आहे. समूहाच्या लिस्टेड कंपन्यांनी प्रचंड कर्ज घेतलेले आहे. जेव्हा शेअर्सचे दर फार वाढलेले होते, तेव्हा त्या गहाण ठेवून घेतलेले कर्जही यात आहे. त्याने संपूर्ण समूहाची आर्थिक स्थिती डावाडोल केलेली आहे.

अदानी समूहाचे उत्तर काय?

१) समूहाच्या समभागधारकांना तसेच गुंतवणूकदारांना हिंडेनबर्गने अदानी समूहावर खोटे आरोप करून हादरवून सोडले. समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळावेत म्हणून रचला गेलेला हा कट आहे.
२) केवळ एका विशिष्ट कंपनीवर हा हल्ला नसून, भारत, भारतीय आस्थापनांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता तसेच भारताच्या विकासगाथेवर, आर्थिक महत्त्वाकांक्षेला बाधा पोहोचविण्याचा कुटिल डाव त्यामागे आहे.
३) हिंडेनबर्गचा अहवाल समूहाच्या विरोधकांकडून मिळालेल्या खोट्या माहितीच्या आधारावर तयार केला गेला आहे. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड भारतात इक्विटी शेअरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक ऑफर सादर करत असतानाच हा अहवाल जाहीर होणे, हिंडेनबर्गचा वाईट हेतू सिद्ध करण्यास पुरेसे आहे.
४) यूएस ट्रेडेड बाँडस्, नॉन इंडियन-ट्रेडेड डेरिव्हेटिव्ससह अन्य नॉन इंडियन-ट्रेडेड रेफरन्स सिक्युरिटीजच्या माध्यमातून अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांत शॉर्ट पोजिशन ठेवण्याच्या हेतूने हा अहवाल जारी करण्यात आला आहे. हिंडेनबर्ग एक नैतिकता नसलेले शॉर्ट सेलर अप्रतिष्ठान आहे. सिक्युरिटीज मार्केट बुक्समध्ये शॉर्ट सेलर शेअर्सच्या दरात नंतरच्या घसरणीतून फायदा लाटणे, हा हिंडेनबर्गचा उद्योग आहे.

हिंडेनबर्गचे प्रत्युत्तरही अगदी तातडीने :

अदानी यांनी आमच्या अहवालाला उत्तर देताना अहवालातील केवळ ३० पानेच डोळ्यासमोर ठेवलेली दिसतात. कोर्टातील रेकॉर्डची ३३० पाने आहेत. उच्च पातळीचे वित्तीय व्यवहार, इतर सामान्य माहिती तसेच अनुचित सामाजिक पुढाकार उदाहरणार्थ महिला उद्योजिकांना अदानी समूहाने दिलेले कथित प्रोत्साहन, अदानी समूह करत असलेले सुरक्षित आरोग्यदायी भाजीपाल्याचे उत्पादन आदींबद्दल त्यांनी ब्र काढलेला नाही, असे अदानींच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना हिंडेनबर्गने सोमवारी स्पष्ट केले. आम्ही ८८ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील ६२ प्रश्नांची उत्तरे देण्यात अदानी सपशेल अपयशी ठरले आहेत, असा दावाही हिंडेनबर्गने केला आहे.

हिंडेनबर्ग कंपनीबद्दल :

नॅथन अँडरसन यांनी २०१७ मध्ये हिंडेनबर्ग नावाने ही कंपनी सुरू केली. शेअर मार्केट, इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिवज्वर रिसर्च करते आणि यातील लेखापरीक्षणाची सत्यता पडताळते. कुठली कंपनी लबाडी तर करत नाही, हे शोधते.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्याने ६ मे १९३७ रोजी ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात हिंडेनबर्ग नावाचे एक विमान कोसळले होते. यातून बोध घेऊन आर्थिक क्षेत्रातही अशा चुका घडू नयेत, याबद्दल जागृतीसाठी कंपनी सुरू केल्याचा अँडरसन यांचा दावा आहे.

यापूर्वी निकोला, पर्शिंग गोल्ड, ऑप्को हेल्थ, रॉयल ब्लॉकचेन, आरडी लिगल, ट्विटर आदी कंपन्यांचेही वाभाडे हिंडेनबर्गने काढले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page