उद्योगमंत्री ना. उदय सामंत नेमके काय म्हणाले?
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०१, २०२३.
रिफायनरी विरोधकांसंदर्भात राजापूर प्रांत कार्यालयात सुरू असलेली तडीपारी संदर्भातील सुनावणी ७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीला पुन्हा एकदा विरोध सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्या सहा जणांना पोलीस यंत्रणेकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, यासंदर्भात रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सत्यजित चव्हाण, सतीश बाणे, दिपक जोशी, नितिन जठार आणि नरेंद्र जोशी यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहे. याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, आम्ही सध्या रिफायनरी बाबत सकारात्मक पावले टाकत आहोत. शेतकऱ्यांचे म्हणणे आम्ही ऐकायला तयार आहोत. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे, दादागिरी आणि दडपशाही करून काेणीही रिफायनरीला विरोध करू नका, असे उद्याेग मंत्री उदय सामंत म्हणाले.
तसेच, सध्या जे कोणी टीका करत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायची काहीही गरज नाही. कारण मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले आहेत आणि आपल्या राज्यात परदेशी गुंतवणुकदार माेठ्या प्रमाणात येऊ शकतात, हेदेखील राज्य सरकारने दाखवून दिलेले आहे, असे सामंत म्हणाले. दरम्यान, सर्वतोपरी पॅकेज देण्यासाठी आमची तयारी आहे. स्कूल, आराेग्य यंत्रणा, काैशल्य विकासाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करण्याच्या तयारीत आम्ही आहाेत, असे त्यांनी सांगितले. हे जाळून टाकू, तिकडे ताेडफाेड करू ही भाषा न करता सरळ सरकार बराेबर चर्चा करावी, असे आवाहनसुद्धा उदय सामंत यांनी केले आहे.