
*देवरूख-* संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल शाखेच्यावतीने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट (आय पी आर) म्हणजेच “बौद्धिक संपदा हक्क” या महत्वपूर्ण विषयावर ऑनलाइन चर्चासत्र संपन्न झाले. हे चर्चासत्र कोकणातील विविध भागातील अभियांत्रिकी पदवी तसेच पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख आणि संस्थांचे प्राचार्य या सर्वासाठी खुले ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल ३०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला.
चर्चासत्रामध्ये बौद्धिक संपदा हक्क आणि पेटंटमधील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. बी.के. सरकार (पेटंट गुरू), पोस्ट.डीओसी (सिंगापूर) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सहभागींना प्रथम पेटंटशी संबंधित प्रमुख संज्ञा आणि संकल्पनांची ओळख करून दिली. त्यानंतर नाविन्यपूर्ण आणि पेटंट करण्यायोग्य कल्पना कशा ओळखाव्या आणि त्यांचे हक्क कसे प्राप्त करावे यासंदर्भामध्ये विस्तृतपणे माहिती दिली. कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटंट मसुदा, दावा सूत्रीकरण, पेटंट दाखल करणे, तसेच तंत्रज्ञान व्यापारीकरण आणि हस्तांतरणाच्या प्रक्रियांच्या मूलभूत गोष्टींवर सखोल चर्चा केली. यामधील व्यापार रहस्य व त्याचे उद्दिष्ट उदाहरणादाखल स्पष्ट केले. तसेच शेवटी ट्रेडमार्क बनावटीकरण रोखण्यासाठीच्या कायद्यामधील तरतुदी स्पष्ट केल्या.
याव्यतिरिक्त चालू सहामाही सत्रामध्ये मेकॅनिकल व ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांसाठी इतर विविध प्रशिक्षण वर्ग व परिसंवाद घेण्यात आले. यामध्ये कॅड कॅम ब्रिज पुणेचे संचालक तुकाराम वरक यांच्या सहकार्याने अँसिस या सॉफ्टवेअर वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मेकॅनिकल विभागाच्या कॉम्प्युटर व सॉफ्टवेअरने सुसज्ज अशा लॅबमध्ये हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ‘स्वतःचा एआय अवतार तयार करणे’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रसिद्ध एआय आणि सायबरसुरक्षा तज्ञ श्री. अभिनव देवगुप्तपू यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आयआयटी गुवाहाटी आणि भारत सरकारच्या ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी) यांच्या सहकार्याने डी आय वाय गुरु संस्थेने ‘ईव्ही चार्जिंग टेक्नॉलॉजी’ या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. या वेबिनारचे उद्दिष्ट व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना ई-मोबिलिटीमध्ये त्यांच्या करिअरला गती देण्यास मदत करणे होते. डी आय वाय गुरु, पुणेचे तांत्रिक प्रमुख प्रसाद कदम यांनी या वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.
या महाविद्यालयाला नॅकची बी ++ श्रेणी प्राप्त असून मेकॅनिकल विभागहि एनबीए मानांकित आहे. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. प्रशांत क्षीरसागर व विभागातील प्राध्यापक यांनी या चर्चासत्राचे नियोजन केले. त्यांना प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि उपप्राचार्य डॉ. अनिरुध्द जोशी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. क्षीरसागर यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उद्योग जगताची सद्याची गरज लक्षात यावी व त्यादृष्टीने त्यांची शैक्षणिक पात्रतेबरोबरच आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत हे यामागचे महत्वाचे प्रयोजन असल्याचे सांगितले. संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे यांनी मेकॅनिकल व ऑटोमोबाईल विभागाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले.