दिवाळीत काँग्रेसला मोठा धक्का:मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज…

Spread the love

मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मुंबईत मोठा झटका बसला आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोड भाजपचे कमळ हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर रवी राजा यांची भाजपच्या मुंबई उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. काँग्रेसमध्ये मेरिटनुसार तिकीट मिळत नसल्याचा आरोप रवी राजा यांनी केला होता. पक्षाने 44 वर्षीय सेवेचा सन्मान केला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

मुंबई महापालिकेत भूषवले विरोधी पक्ष नेते पद…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद भूषवले आहे. ते काँग्रेसचा मुंबईतील चेहरा मानले जातात. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद भूषवलेल्या मधुकरराव पिचड, नारायण राणे यांच्यापासून एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर केल्याच्या परंपरेत आता माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांची भर पडली आहे.

रवी राजा यांच्या जनसंपर्काचा भाजपला फायदा होईल…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता भाजमध्ये आले ही भाजपसाठी आनंदाची बाब आहे. 23 वर्षे बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. रवी राजा यांचा मोठा जनसंपर्क आहे, त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल. रवी राजा यांचा अनुभवाचा भाजपला फायदा होईल. पुढच्या काळात काँग्रेसची काही प्रमुख मंडळी रवी राजा यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, महानगरपालिका आणि मुंबईत काँग्रेस टिकवून ठेवणाऱ्या लोकांमध्ये रवी राजा यांचा समावेश आहे. सायन कोळीवाडा त्यांचे क्षेत्र आहे. तिथे आमच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी मोठा हातभार लागेल. येत्या काळात अनेक चांगले नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील.

कोण आहेत रवी राजा ?


रवी राजा हे मुंबई महापालिकेतले काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते पाच वेळा मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून नगरसेवक राहिलेले आहेत. काँग्रेसचा महापालिकेतला चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यांनी पाच वर्षे मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले. रवी राजा हे सायन कोळीवाड्यात तामिळ आणि मराठी मतदारांत लोकप्रिय आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page