
देवरूख- रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या फंडातून संगमेश्वर तालुक्यातील दिव्यांगांसाठी व अपंगांसाठी देवरूख येथे गुरूवारी वस्तू वाटप करण्यात आले.
काही महिन्यांपुर्वी तालुक्यातील दिव्यांग व अपंगांचे देवरूख पंचायत समिती येथे शासनामार्फत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तपासणी शिबिरात दिव्यांग व अपंग व्यक्तींना लागणाऱ्या आवश्यक वस्तुंची मागणी करण्यात आली होती. या वस्तुंचे खासदार नारायण राणे यांच्या फंडातून देवरूख पंचायत समिती येथे गुरूवारी वाटप करण्यात आले. या वस्तूंमध्ये दिव्यांग बांधवांसाठी बॅटरीवर चालणारी सायकल, सेन्सर बॅटरी, कानाचे मशीन, याच बरोबर दिव्यागांना लागणारी अत्याधुनिक साधने यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष रूपेश कदम, तालुका उपाध्यक्ष अभिजित सप्रे, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सितेश पर्शराम, युवा मोर्चा देवरूख शहर अध्यक्ष पुष्कर शेट्ये, प्रमोद शिंदे, विस्तार अधिकारी शंकर घुले, विस्तार अधिकारी श्री. पारशे उपस्थित होते.