विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट; एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल; राजकीय चर्चांना उधाण…

Spread the love

मुंबई- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल. आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील बदलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेलं राज्य विधानसभेचं अधिवेशन हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनात लोकसबा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली सत्ताधारी महायुती आणि विजयामुळे आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी यांच्यात विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टने जाण्यासाठी आले असता, देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टसमोर गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी तळमजला ते तिस-या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला. दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले असता तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना ब-याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अनिल परब यांचे अ‍ॅडव्हान्समध्ये अभिनंदन करत आहोत असे सांगत सर्वांच्या नजरा वळवल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page