संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेत शनिवारी आग लागल्याने दोन दुकाने जळून खाक झाली. या दोन्ही दुकानमालकांची भेट घेऊन आज माजी आमदार व भाजपाचे विधानसभा प्रमुख बाळ माने यांनी धीर दिला. दुकानदारांचे सांत्वन केले आणि मदतीचे आश्वासनही दिले.
दोन दिवसांपूर्वी पहाटे संगमेश्वर बाजारपेठेत कांतीभाई पटेल यांच्या शक्ती ट्रेडर्स व प्रशांत बेंडके यांच्या किराणा दुकानाला आग लागली. आग इतकी भयानक होती की दोन्ही दुकानातील मालही जळून गेला, आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कांतीभाई व प्रशांत बेंडके यांची भेट आज बाळासाहेब माने यांनी घेतली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांचे सांत्वन केले. दोन्ही मालकांना धीर दिला.
भाजपा नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून काही मदत देऊ, असेही माने यांनी सांगितले. या वेळी नावडी ग्रामपंचायतीचे सरपंच विवेक शेरे, तालुका सरचिटणीस सतीश पटेल, व्यापारी बंधू व ग्रामस्थ उपस्थित होते.