*जालन्यातील वडीगोद्री इथं ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 13 जुनपासून आमरण उपोषण सुरू केलंय. आज उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीय.*
*जालना :* जिल्ह्यातील वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 13 जुनपासून ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यामुळं सरकार पुन्हा एकदा त्यांच्या आमरण उपोषणानं गोत्यात आलंय. आज यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत आहे.
*उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली :* उपोषणाच्या सातव्या दिवशी आज सकाळी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या प्रकृतीची वैद्यकीय पथकानं तपासणी केली. यावेळी गेल्या तीन दिवसांपासून रक्तदाब वाढत असल्यानं त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो, असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी दिला. त्यामुळं त्यांना तातडीनं उपचाराची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे यांनी दिली. तोच दुसरीकडे त्यांच्या या आमरण उपोषणाची राज्यभारातील ओबीसी समाज बांधवांनी दखल घेऊन वडीगोद्रीच्या दिशेनं मोठ्या संख्येनं ओबीसी समाजबांधव उपोषण स्थळी दाखल होत असल्याचं दिसतंय. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन एक शिष्टमंडळ त्यांची समजूत काढण्यासाठी आलं होतं. मात्र उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही आसा ठाम निर्णय घेतला.
*सरकारनं आंदोलनाची दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात :* या आंदोलनाला आता मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावल्यानं सरकारनं या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भावना पाठिंबा देण्यास आलेल्या ओबीसी बांधवांनी व्यक्त केली. या संदर्भात उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं. सरकारनं ओबीसींच्या आरक्षणावर लेखी आश्वासन देत जी भीती ओबीसी समाज बांधवांमध्ये आहे ती दूर करावी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलीय. दरम्यान उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावत असल्यानं त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात तसंच परिसरात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आलंय.