रत्नागिरी- मांडवी समुद्र किनारी काल महाप्रचंड व्हेल मासा मृतावस्थेत वाहून आला होता.
समुद्र किनारी अशा प्रकारे मृत मासे येणे दुर्मिळ असले तरी कोकण किनाऱ्यावर अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या वेळी प्रशासन मृत माशाच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक कारवाई करत असते.परंतु, पर्यटन आणि स्थानिक लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असूनही मध्यरात्री प्रशासनाने या मृत माशाची
विल्हेवाट लावण्याची घाई केल्याचे आढळून आले आहे.
पहाटे तीन वाजेपर्यंत किनाऱ्यावरील वाळूत खड्डा खणून त्यात हा मासा पुरण्यात आला होता. हा खड्डा अपुरा आणि येणाऱ्या भरतीत उघडा पडेल आणि मासा परत उघड्यावर येऊन दुर्गंधी पसरेल असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगायचा प्रयत्न केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून कसाबसा तो मृत मासा पुरण्यात आला.
आज सकाळी समुद्राच्या पाण्याच्या हालचालींनी मृत मासा खड्डा अपुरा असल्याने पुनः बाहेर आला आहे आणि सर्व किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे.
प्रशासनाच्या या घिसाड घाई मुळे नेमक्या पर्यटन मोसमामध्ये या दुर्गंधीचा त्रास होत असल्याने स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.