पनवेल- पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धाब्याचे पेव फुटले आहे. या ठिकाणी बेकायदेशीररित्या मद्यप्राशन आणि विक्री केली जाते. त्यामुळे अधिकृत बिअर बार व रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याविरोधात पनवेल ग्रामीण आणि शहरी एक्साईज बार असोसिएशनने गुरुवारी (28 मार्च) थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे.
संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.मुंबई आणि कोकणाचे प्रवेशद्वार असणार्या पनवेल परिसरातून महामार्ग जातात. पनवेल हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर प्रकल्पामुळे या भागाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत धाबे थाटण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वाईन शॉपवरुन मद्य आणून तळीराम बसतात. पनवेल परिसरातीलच नव्हे तर नवीन पनवेल ठाणे आणि मुंबईतून मद्यपी पार्टी करण्यासाठी या धाब्यांवर येतात. या ठिकाणी गुन्हेगारांचासुद्धा वावर असतो.
या धाब्यांवर मद्यप्राशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. याव्यतिरिक्त येथे बेकायदेशीर दारूची विक्रीही केली जाते. सुट्टीच्या दिवशी तर हे धाबे हाऊसफुल होतात.दारू पिऊन दररोज मारामार्या तसेच वाद तंटे धाब्यावर होतात. त्यामुळे बिअर बार आणि परमिट रूमकडे ग्राहकांकडून काही प्रमाणात पाठ फिरवली जात असल्याचा दावा पनवेल ग्रामीण व शहरी एक्ससाइज बार असोसिएशनकडून करण्यात आला आहे.
याबाबत गुरुवारी निरीक्षक आव्हाड यांना निवेदन देऊन संबंधित बेकायदेशीर धाब्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची न्याय मागणी बार मालकांनी केली आहे. जर याबाबत ठोस भूमिका घेतली गेली नाही तर एक्साईजला जे मासिक शुल्क अदा करावे लागते ते करण्यात येणार नाही, असा इशारा असोसिएशनकडून देण्यात आला आहे.